प्रवाशांची दिवाळी महाग होणार!

पिंपरी – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एस. टी.) यावर्षीही दिवाळीत तिकीट दर वाढ करणार असल्याने यंदाची दिवाळी प्रवाशांना महाग होणार आहे. दिवाळीनिमित्त दरवाढीची भेट प्रवाशांना देण्याचे राज्य परिवहन मंडळाने ठरवल्याचे दिसते. सतत इंधन दरवाढ, कर्मचाऱ्यांवर जादा खर्च, प्रवाशांची घटती संख्या, उपाय योजना करुनही अल्प प्रतिसाद यामुळे ही वाढ आहे. गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांनी पगार वाढ व इतर मागण्यासाठी संप पुकारल्याने एस. टी. ला ऐन दिवाळीतच राज्यभर ठप्प व्हावे लागल्यामुळे एस. टी. चे बजेट कोलमडले आहे.

गेल्या वर्षीची थोडीफार का होईना भरपाई करण्याचा यंदा इरादा दिसत आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून दरवर्षी दिवाळीत वाढ करण्यात येते. यावर्षीची दरवाढ ही केवळ वीस दिवस असल्याचे प्रशासनाचे म्हणणे असले, तरी ती कमी होण्याची शक्‍यता फारच कमी आहे. दर वाढ करायचीच होती; मात्र त्यांनी दिवाळीचा मुहूर्त साधून केली, अशी सुद्धा चर्चा आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काही महिन्यांपासून एस. टी. ला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून त्यात तोटा कमी होत नसल्याने दर वाढी शिवाय पर्याय नसल्याचे एस. टी. चे म्हणणे आहे. त्यामुळे सर्व आगारांना दरवाढीबाबत सूचना दिल्या आहेत. साधारणतः प्रत्येक टप्प्यानुसार 75 पैसे ते 1 रुपया दर वाढ आहे. त्यानंतर 21 नोव्हेंबरपासून भाडेवाढ पूर्ववत्‌ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरवाढ करण्यात आलेल्या बसमध्ये साधी, जलद, रात्रसेवा, निम-आराम, वातानुकुलित शिवशाही बसेसची दर वाढ केली आहे. शिवनेरी व शिवशाहीच्या शयन बसला वगळले आहे. नवीन दर 31 ऑक्‍टोबरच्या मध्यरात्रीपासून 21 नोव्हेंबरपर्यंत आहेत. आगाऊ आरक्षित प्रवाशांनाही दरवाढीचा फटका बसणार असून त्यांच्याकडून पैसे वसूल केले जातील, असे एस. टी. ने सांगीतले आहे. मागील वर्ष वगळता 2016 साली वल्लभनगर आगाराला 19 लाख 10 हजार महसूल मिळाला होता. गेल्या वर्षी संपामुळे जी तूट निर्माण झाली, ती या दिवाळीत भरुन काढण्यासाठी यंदा सुमारे 32 लाखांच्या आसपास महसूल आगाराला अपेक्षित आहे.

3 नोव्हेंबरपासून जादा बस धावणार
-पिंपरी-चिंचवडच्या वल्लभनगर आगारातून दिवाळीसाठी 3 नोव्हेंबरपासून जादा बसेस सुरू होतील. मागणी झाल्यास 10 ते 15 बस प्रवाशांच्या गरजेनुसार सोडण्यात येणार आहेत. अकोला, लातूर, नाशिकसाठी वेळेनुसार पाच जादा गाड्यांची व्यवस्था केली आहे. आगाराला जास्तीत-जास्त महसूल मिळावा व प्रवाशांच्या चांगल्या सोईसाठी यावर्षी 24 हजार 600 किलो मीटर जादा बस धावणार असल्याची माहिती सहाय्यक वाहतूक अधिक्षक पल्लवी पाटील यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)