प्रवरा नदीपात्रा बुडून तीन मुलांचा मृत्यू

संगमनेर – प्रवरा नदीपात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या तिघा शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.नदीपात्रात पाणी असल्याने आणि वाळू उपश्‍यामुळे नदीपात्रात झालेल्या भल्या मोठ्या खड्डयांनी हा बळी घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली. मृतदेह पाण्यावर तरगंत आल्याचे आढळून आल्यानंतर हा प्रकार समोर आला. शहराजवळील मंगळापुर गावात सकाळी ही घटना घडली.
वेदांत विनोद वैराळ (वय 9), समर्थ दीपक वाळे (वय 10) आणि रोहीत चंद्रकांत वैराळ (वय 11) अशी या शाळकरी मुलांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच संगमनेरचे तहसिलदार साहेबराव सोनवणे, पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात, निरीक्षक अभय परमार यांनी कॉटेज रुग्णालयात जावून घटनेची माहिती घेतली. शहरात देखील याची माहिती पसरताच नागरिकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. शहरालगतच असलेल्या मंगळापुर येथे शनिवारी सकाळी शाळेत गेलेली ही मुले घराजवळच असलेल्या प्रवरा नदीपात्रात आंघोळीसाठी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास उतरली होती. नदीकाठी कपडे धुत असलेल्या काही महिलांनी या मुलांना पाण्यात आंघोळ करतांना बघितले. मात्र काही वेळानंतर ही मुले दिसेनाशी झाल्याने महिलांनी केलेल्या आरडाओरडीनंतर या मुलांचा पाण्यात शोध घेण्यात आला, मात्र मुले आढळली नाही. काही वेळानंतर त्यांचे मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे आढळले.
वाळुतस्करांनी केलेल्या नदीपात्रातील खड्डयामुळे या तिघा बालकांचे बळी गेल्याने संताप व्यक्त होत आहे. सध्या प्रवरा नदीला शेतीसाठीचे दिर्घ आवर्तन सुरु आहे. त्यामुळे नदीपात्रात पाणी असल्याने या खड्ड्यांमुळे पाण्याचा नेमका अंदाज पाण्यात उतरलेल्या लोकांना येत नाही. पालकमंत्री राम शिंदे शनिवारी संगमनेरच्या दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर असतांना संपूर्ण प्रशासन त्यांच्यासोबत होते. मात्र दौरा संपून काही वेळ होत नाही तोच ही दुख:द वार्ता समोर आल्याने अधिकाऱ्यांनी लगेचच कॉटेज रुग्णालयात धाव घेतली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)