प्रलोभनाचा रोज एक बळी

फसवणुकीचे प्रकार वाढले ः वर्षभरात 329 जणांना गंडा
पिंपरी – नोकरी, लग्न, व्यापार, गुंतवणूक, ऑनलाईन खरेदी अशा अनेक प्रकारांमध्ये दिवसेंदिवस फसवणुकीचे प्रकार वाढत असून त्याची सरासरी आता दिवसाला एक अशी झाली आहे. यामध्ये उच्चशिक्षित तरुण-तरुणींचा समावेश देखील मोठा आहे. सध्याच्या काळाता सर्व व्यवहार ऑनलाईन पद्धतीने होतात. त्यामध्ये खरेदी-विक्री असो किंवा ऑनलाईन होणारी मैत्री किंवा प्रेम हे करत असताना पटकन एखाद्यावर विश्‍वास ठेवणे हे घातक ठरू शकते. पिंपरी-चिंचवड शहरात 2018 या एका वर्षात कोणत्या ना कोणत्या आमिषाला बळी पडून फसवणूक झालेल्यांची संख्या तब्बल 329 इतकी आहे. त्यातील सुमारे 64 टक्के गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केली आहे. पोलिसांपर्यंत पोहचलेले 329 जण आहेत, फसवणूक झाल्यानंतर पोलिसांकडे न जाणाऱ्यांची संख्या याहून अधिक असू शकते.

सध्या सुशिक्षित बेरोजगरांचा संख्या ही झपाट्याने वाढत आहे. बेरोजगार तसेच नोकरी बदलण्यासाठी इच्छुक असलेले बरेचजण नोकरीच्या शोधार्थ त्यांची वैयक्‍तिक माहिती देखील अनेक ऑनलाईन साईटवर टाकत असतात, मध्यंतरी हिंजवडी येथील आयटी कंपनीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर इतर राज्यातील तरुणांना सुमारे आठ लाखांचा गंडा घातला होता. नोकरीसाठी तरुण जेव्हा आयटी पार्क येथे गेले तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाली असल्याचे कळाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अशाच प्रकारे लग्नासाठी देखील अनेकजण ऑनलाईन साईटवर फोटो, व माहिती टाकतात. त्यासाठी आता काही मोबाईल ऍप आले आहेत, जे विवाह इच्छुकांशी थेट संपर्क घडवून आणतात. त्याला अनेक तरुण तरुणी बळी पडतात व आपली खासगी माहिती फोटो तेथे शेअर केले जातात व त्याद्वारे मग पुढे ब्लॅकमेल करणे किंवा ती माहिती व्हायरल करणे असे बेकायदेशीर कृत्य केले जाते. सध्या एका विशिष्ट प्रकारे फसवणुकीची घटना वाढत आहेत. ज्यामध्ये परदेशात राहणारा तरुण किंवा तरुणी तुमच्याशी ऑनलाईन मैत्री करतात. पुढे ती मैत्री प्रेमात बदलते व प्रेमाचे प्रतीक म्हणून परदेशातून एक मोठे गिफ्ट तुमच्या नावे पाठवले आहे, असे सांगण्यात येते. मात्र कस्टम ऑफिसरांकडून हे गिफ्ट विमानतळावर अडवले आहे. हे गिफ्ट सोडवण्यासाठी कस्टम ड्युटी भरावी लागेल, असे सांगितले जाते. गिफ्ट सोडवले नाही तर तुझ्यावर किंवा माझ्यावर कारवाई होईल अशी भिती घातली जाते. गिफ्ट सोडवण्यासाठी एका अनोळखी व्यक्तीच्या खात्यावर लाखो रुपये टाकण्यास सांगितले जाते. पैसे जमा केल्यानंतर आपल्या प्रिय व्यक्‍तीचा फोन कायमस्वरुपी बंद होतो, तेव्हा लक्षात येते की आपली फसवणूक झाली आहे. काही महाभाग तर आपण स्वतःच मोठ्या प्रमाणात दागिने आणि गिफ्ट घेऊन येत आहोत आणि दिल्ली किंवा चेन्नईच्या एयरपोर्टवर अडकलो असल्याचे सांगून पैसे उकळतात. या फसवणुकीला सुशिक्षित मोठ्या प्रमाणत बळी पडत आहेत.

बॅंकेचे एटीएम कार्ड एक्‍सपायर झाले आहे, क्रेडिट कार्डचे रिवॉर्ड पॉईंट मिळणार आहेत, तुम्ही कधी न काढलेल्या पॉलिसीचे पैसे मिळणार आहेत, निवृत्त झाले असाल तर पीएफ आणि ग्रॅच्युईटीची आणखी रक्‍कम मिळणार आहे, असे अनेक फोन व एसएमएस येत असतात. दहापैकी एक जण तरी या थापेला बळी पडून आपला खाते क्रमांक, एटीएम, पिन कार्ड एवढेच नव्हे तर वन टाईप पासवर्ड देखील फोन करणाऱ्यांना देतात आणि आपल्या खात्यातील रक्‍कम संपवून घेतात. बॅंक व पोलिसांनी सुद्धा आवाहन केले आहे की कोणतीच बॅंक फोनवरून तुमच्या खात्याबाबत अशी माहिती मागत नाही, त्यासाठी तुम्हाला संबंधित शाखेत भेटण्यासाठी बोलावले जाते. त्यामुळे नागरिकांनीही आपली वैयक्तीक माहिती खात्री केल्याशिवाय कोणालाही देऊ नये.

फसवणुकीची पुनरावृत्ती
लग्नाचे आमिष, लॉटरी, एटीएम कार्ड बंद, रिवार्ड पॉईंट या फसवणुकीचे प्रकार वारं-वार होत आहेत. या संदर्भातील बातम्या कित्येकदा प्रसिद्ध झाल्या आहेत. बॅंक व पोलिसांनी कित्येकदा प्रबोधन करूनही कित्येक जण फसवणुकीचे बळी होत आहेत. बाहेरच्या जगाशी जास्त संबंध न ठेवणारे, बातम्या न वाचणारे लोक सहज ठगांचे शिकार होतात.

 60 टक्के गुन्ह्यांची उकल
परिमंडळ एकमध्ये वर्षभरात एकूण 157 गुन्हे दाखल झाले असून त्यातील 118 गुन्ह्यांची उकल झाली आहे म्हणजे एकूण 75 टक्के गुन्हे उघडकीस आले आहेत. तर परिमंडळ दोनमध्ये फसवणुकीचे 172 गुन्हे दाखल झाले असून यातील 110 गुन्हे उघडकीस आले आहे. उकल झालेल्या गुन्ह्यांची उकल 64 टक्के गुन्ह्यांची उकल झाली आहे. यामध्ये फसवणूकीचे वाकड पोलीस ठाण्यात सर्वाधीक म्हणजे 41 गुन्हे दाखल झाले आहेत. त्या खालोखाल हिंजवडी, सांगवी,तळेगाव या पोलीस ठाण्याच क्रमांक असून वर्षभारत या तीन पोलीस ठाण्यात 35 फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)