प्रभात स्पेशल: घटनेच्या निर्मितीत महिलांचे योगदान 

स्वप्निल श्रोत्री

देशाचे पहिले कायदामंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीद्वारे राज्यघटनेच्या मसुद्याला दिशा दिली. त्यांना यथार्थतेने भारतीय राज्यघटनेचे निर्माते म्हणून ओळखले जाते. एकूण 296 सदस्य (एकूण जागा 389; परंतु, संस्थानिकांच्या बहिष्कारामुळे 93 जागा रिकाम्या राहिल्या) असलेल्या घटना समितीत 15 महिलांचे योगदानही मोठे होते. तेव्हा सध्या सुरू असलेल्या 69 व्या संविधान सप्ताहानिमित्त (26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर) अशा कर्तृत्ववान महिलांचे स्मरण करणे गरजेचे आहे… 

राज्यघटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली व तिची स्वीकृती 26 नोव्हेंबर 1949 रोजी होईपर्यंत घटना बनविण्याचे काम सुरू होते. घटना समितीने 2 वर्षे 11 महिने 18 दिवस कार्य केले. या कालखंडात घटना समितीची 11 सत्रे झाली. स्वातंत्र्यानंतर भारताचा स्वतंत्र देश म्हणून राज्यकारभार कसा असावा ह्यासाठी भारतीय संविधानाची अर्थात घटनेची निर्मिती होणे महत्त्वाचे होते. त्यानुसार ब्रिटिश सरकारने कॅबिनेट मिशन योजनेंतर्गत नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान सभेची स्थापना केली.

कॅबिनेट मिशन हे 24 मार्च 1946 ला भारतात आले. त्यांनी त्यांची योजना 16 मे 1946 रोजी प्रसिद्ध केली. ह्यामध्ये तीन सदस्य होते. लॉर्ड पेथिक लॉरेन्स, स्टॅफोर्ड क्रिप्स व ए. व्ही अलेक्‍झांडर. या घटना समितीने 2 वर्षे 11 महिने 18 दिवस काम केले. या कालखंडात घटना समितीची 11 सत्रे झाली. आपल्या घटनाकारांनी सुमारे 60 देशांच्या घटनांचा अभ्यास केला आणि या घटनेच्या अंतिम मसुद्यावर 114 दिवस विचारविनिमय केला. घटना निर्मितीसाठी एकूण 64 लाख रुपये खर्च आला. 24 जानेवारी 1950 रोजी घटना समितीचे अखेरचे सत्र झाले. या घटना समितीमधील 15 महिला सदस्य कोण होत्या…?

 •  अम्मु स्वामीनाथन : केरळमधील पालघाट जिल्ह्यातील हिंदू कुटुंबात जन्मलेल्या अम्मु स्वामीनाथन मद्रास मतदारसंघातून संविधान सभेच्या सदस्य होत्या. 24 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेत केलेल्या भाषणात त्या म्हणाल्या की, “बाहेरचे लोक म्हणत आहेत की, भारत आपल्या स्त्रियांना समान अधिकार देत नाही. आता आपण असे म्हणू शकतो की, जेव्हा भारतीय लोकांनी स्वत:च्या संविधानाची रचना केली तेव्हा त्यांनी देशातील इतर नागरिकांप्रमाणे महिलांना अधिकार दिले आहेत.’ संविधान सभेच्या समाप्तीनंतर राष्ट्रीय राजकारणात त्यांचा सक्रिय सहभाग होता.
 • दक्षिणाणी वेलयुद्धन : कोचीन मतदारसंघातून संविधान सभेवर आलेल्या दक्षिणाणी वेलयुद्धन ह्या एकमेव दलित महिला होत्या. त्यांनी नेहमीच समतेचे विचार मांडले.
 • बेगम अजाज रसूल : उत्तर प्रदेशच्या राजकारणावर विशेष छाप असलेल्या बेगम रसूल या संविधान सभेवर आलेल्या एकमेव मुस्लीम महिला होत्या. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
 • दुर्गाबाई देशमुख : वर्ष 1975 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरविलेल्या दुर्गाबाई देशमुख ह्या तरुण वयापासूनच सत्याग्रह चळवळीत सहभागी होत्या. वर्ष 1936 मध्ये त्यांनी आंध्र महिला सभेची स्थापना केली. त्या लोकसभेच्या सदस्या होत्या.
 •  हंसा जीवराज मेहता : वर्ष 1897 मध्ये जन्मलेल्या हंसा मेहता यांनी इंग्लंडमध्ये पत्रकारिता आणि समाजशास्त्र यांचा अभ्यास केला होता. गुजराथी भाषेत मुलांसाठी त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. वर्ष 1945-46 मध्ये त्या अखिल भारतीय महिला परिषदेच्या अध्यक्षा होत्या.
 • कमला चौधरी : लखनौच्या धनवान कुटुंबात जन्मलेल्या कमला चौधरी ह्यांनी आपल्या पिढीजात श्रीमंतीचा त्याग करून भारतीय राष्ट्रीय चळवळीत सहभागी झाल्या. 70 च्या दशकात त्या लोकसभेच्या सदस्य होत्या.
 • लीला रॉय : ऑक्‍टोबर 1900 मध्ये आसामच्या गोलपाडालीला भागात जन्मलेल्या लीला रॉय यांना राजकारणाचे धडे आपल्या वडिलांकडूच मिळाले. त्यांचे वडील राष्ट्रीय चळवळीत सहभागी होते. लीला रॉय यांनी वर्ष 1921 मध्ये बेथून कॉलेजमधून पदवी मिळविली. तर 1923 मध्ये त्यांनी आपल्या मित्रांसमवेत दीपाली संघाची आणि एका शाळेची स्थापन केली, जी पुढे राजकीय चर्चांचे केंद्र बनली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विश्‍वासू सहकारी म्हणून रॉय यांची विशेष ओळख आहे.
 • मालती चौधरी : ओडिशाचे माजी मुख्यमंत्री असलेल्या नभकृष्ण चौधरी यांच्या पत्नी मालती चौधरी ह्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय होत्या. कॉंग्रेसमध्ये सामील होऊन त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतला. सत्याग्रहासाठी अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी त्यांनी शिक्षित लोकांशी संवाद साधला. वर्ष 1933 मध्ये त्यांनी आपल्या पतीसोबत उत्कल कॉंग्रेस समाजवादी कर्म संघाची स्थापना केली. वर्ष 1934 मध्ये त्या ओडिशातील गांधीजींच्या पदयात्रेत सामील झाल्या. ओडिशातील असुरक्षित समुदायांच्या उन्नतीसाठी बाजीराव छात्रवाससारख्या अनेक संस्थांची स्थापना त्यांनी केली. इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीच्या घोषणेच्या त्यांनी निषेध केल्याने त्यांना कारावास भोगावा लागला.
 • पूर्णिमा बॅनर्जी : पूर्णिमा बॅनर्जी ह्या अलाहाबादमधील भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस कमिटीच्या सचिव होत्या. “सत्याग्रह’ आणि “भारत छोडो’ आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली होती. संविधान सभेमध्ये पूर्णिमा बॅनर्जी यांच्या भाषणांचा एक महत्त्वपूर्ण पैलू म्हणजे म्हणजे समाजवादी विचारधाराबद्दल त्यांची दृढ वचनबद्धता.
 • राजकुमारी अमृत कौर : ब्रिटनमधील ऑक्‍सफर्ड विद्यापीठात शिकलेल्या राजकुमारी अमृत कौर ह्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्य मंत्री होत्या. त्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या (एम्स) संस्थापक सदस्यही होत्या.
 • रेणुका रे : आयसीएस अधिकारी सतीशचंद्र मुखर्जी यांची कन्या असलेल्या रेणुका रे यांनी महिला व दिव्यांगांसाठी विशेष कार्य केले. “लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍स’मधून त्यांनी बी.ए. पूर्ण केले. संविधान सभेत रेणुका रे यांनी एकसमान वैयक्‍तिक कायद्याची मागणी केली होती.
 • डॉ. सरोजिनी नायडू : केंब्रिज विद्यापीठात शिकलेल्या सरोजिनी नायडू या अखिल भारतीय कॉंग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतीत ह्या महत्त्वाच्या नेत्या होत्या. उत्तम कवयित्री असलेल्या सरोजिनी नायडू यांना संयुक्‍त प्रांताच्या प्रथम राज्यपाल होण्याचा मान दिला जातो.
 • सुचेता कृपलानी : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आचार्य जे. बी कृपलानी ह्यांच्या पत्नी असलेल्या सुचेता कृपलानी ह्या उत्तर प्रदेशच्या चौथ्या तर भारतातल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या.
 • डॉ. विजयालक्ष्मी पंडित : संयुक्‍त राष्ट्रांच्या मुख्य परिषदेच्या पहिल्या महिला अध्यक्षा होण्याचा मान विजयालक्ष्मी पंडित यांना जातो. भारतीय स्वतंत्र्य चळवळीत तीन वेळा तुरूंगवास झालेल्या पंडित ह्या पंतप्रधान पंडित नेहरू ह्यांच्या भगिनी होत.
 • ऍनी मास्केरेन : ऍनी मास्केरेन यांचा जन्म केरळमधील तिरुवनंतपुरम्‌ येथील लॅटिन कॅथलिक कुटुंबात झाला. त्रावणकोर राज्य कॉंग्रेसमध्ये सामील होणाऱ्या त्या पहिल्या महिला होत. 1937 ते 1977 ह्या काळात विविध कारणांसाठी त्यांनी तुरुंगवास भोगला आहे. मास्केरेन 1951 च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्या लोकसभेसाठी निवडून आल्या होत्या. केरळमधील त्या पहिल्या महिला खासदार होत्या.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
5 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)