प्रभात विशेष- भाषा जपायची बोलणाऱ्यांनी; कायद्याने नव्हे : डॉ. अरुणा ढेरे

अरुणा ढेरे

शुक्रवार, दि. 11 पासून यवतमाळ येथे सुरू होणारे 92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वादाच्या केंद्रस्थानी सापडले आहे. मात्र, काहीही झाले तरी “शो मस्ट गो ऑन’ प्रमाणे हे संमेलन पार पडेलही. यानिमित्ताने संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांच्याशी मराठी भाषा, साहित्यिकांना मिळणारी वागणूक आणि एकूणच कोश परंपरेचे महत्त्व याविषयी चर्चा झाली. डॉ. अरुणा ढेरे यांनी मांडलेली मते खास “प्रभात’च्या वाचकांसाठी…

मी विविध साहित्य प्रकारांचे लेखन केलेले असताना त्यापैकी “कविता’ या प्रकाराबद्दल बोलणे मला मोलाचे वाटते. इतर कोणत्याही साहित्य प्रकारांपेक्षा कवितेमध्ये सर्वात जास्त ताकद आहे. जे हजार शब्दांत सांगता येत नाही ते कवितेच्या दोन ओळींमध्ये सांगता येते. कविता या साहित्य प्रकारात अनेकार्थी सूचकता असते. खरे तर हौस म्हणून कविता लिहायला सुरुवात होत असते. अनेक नामांकितांच्या लेखनाची सुरुवात कवितेपासूनच झाल्याचे आपल्याला दिसून येते. कविता म्हणजे संवेदनांना जाग येण्याचा पहिला उद्‌गार आहे. आपल्याकडे कवितांची परंपरा ज्ञानेश्‍वर, तुकारामांच्या काळापासून आहे. त्यांनी त्या काळातसुद्धा शब्दांमधून साक्षात्कार उतरविला होता. कविता ही जीवन साधना आहे. याचा विचार केला तर तो अधिक खोलवर विचार होतो. तुम्हाला जीवनाचे आकलन किती झाले यावर कवितेची खोली आणि रूंदी अवलंबून असते. मात्र, कवितेच्या परंपरेचा विचार करता अनेक सृजनशील साहित्यिकांना आवश्‍यक तो सन्मान आपल्याकडे दिला जात नाही, याची खंतच वाटते. युगप्रवर्तक कवी मानल्या गेलेल्या बा. सी. मर्ढेकरांची त्यांच्या हयातीतच कितीतरी उपेक्षा झाली हे सर्वचजण जाणतात. कारण मर्ढेकरांच्या कलाकृतीची उंची समजून घेणारा माणूस त्यांना भेटला नव्हता. त्या काळाच्या समाजापेक्षा मर्ढेकरांचा विचार काळाच्या पुढचा होता. त्यामुळे ता समाजाला मर्ढेकर समजलेच नाहीत. त्यांच्या कवितेचे मोठेपण अजूनही उलगडलेले नाही. असा संघर्ष अनेक दिग्गज साहित्यिकांच्या वाट्याला आजही येत असतो. दुसरे म्हणजे, आपल्याकडे उत्तम आणि प्रगल्भ वाचकही आहेत. निर्मितीइतक्‍याच ताकदीचे वाचक आपल्या साहित्याला लाभले आहेत. मात्र, आपल्या समाजाकडे असलेली वैचारिक प्रगल्भता कमी पडली; आणि सांस्कृतिक प्रदूषण वाढत गेले. वारंवार हे अनुभव साहित्यिकांच्या वाट्याला आले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मराठी भाषेला प्रदीर्घ असा वारसा आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता भाषेविषयी अनास्था पाहायला मिळत आहे. आपल्याकडे मराठीचा मोठा ऐतिहासिक वारसा आहे. पण सध्या भाषेची प्रचंड अनास्था आणि हेळसांड होत आहे. भाषा ही बोलणाऱ्यांनी जपायची असते, त्यासाठी फक्‍त शासनाने कायदा करून काही होणार नाही. मराठी भाषा जपण्यासाठी सगळ्या समाजाने अंतर्मुख होऊन वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणे गरजेचे आहे. अभिजात दर्जा मिळणे ही तांत्रिक बाब आहे. भाषेच्या प्रतिष्ठेमुळे ती अभिजातच आहे. त्यासाठी सरकारने तो अभिजातपणाचा दर्जा दिला नाही, म्हणून भाषेचे काहीच अडत नाही. प्रश्‍न आहे, आपण आपल्या भाषेला किती जाणतो, किती समजून घेतो, याचा! सिनेमे, मालिका आणि माध्यमांमध्ये वापरली जाणारी मराठी खूपशी चुकीच्या पद्धतीने वापरली जात आहे. अशा चुकांच्या दुरुस्तीसाठी आग्रही असणारे दत्तो वामन पोतदारांसारखे लोक आज आपल्यात नाहीत, हे दुर्दैव आहे. आपण शासकीय भाषेची थट्टा करतो, पण असे थट्टा करणारे लोक तरी बरोबर मराठी भाषा वापरतात का, हे कोण पाहणार?

त्याशिवाय आपल्याकडे कोश वाड्‌मयाची परंपरा खूप पूर्वीपासून आहे. ज्याप्रमाणे कोशाचे काम वाढले पाहिजे, त्याप्रमाणे वाचकांना कोशाकडे वळणे गरजेचे आहे. माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. “इंटरनेट’चा वापर करून मिळालेली माहिती खरी असेलच असे नाही. कोशांमधून मिळणारी माहिती ही अधिकृत, निश्‍चित आणि नेमकी असते. आज समाजात माहिती म्हणजेच ज्ञान असा समज पसरल्याने मोठे गोंधळाचे वातावरण आहे. मराठीमधील कोश परंपरेचा विस्तार व्हायला हवा आहे. त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे.

समकालीन भारतीय भाषा आणि साहित्यामध्ये मराठी भाषेचे असलेले स्थान याविषयी मला वाटते की, विविध भारतीय भाषांमध्ये दिसतात, त्या ताकदीची माणसे मराठीमध्ये कमी आहेत. सजग साहित्यिक कमी आहेत. छोट्या विश्‍वाच्या बाहेर आपण पडत नाही. दलित विद्रोही साहित्य हा महाराष्ट्रातील उगम आहे. पण अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याचा जोरदार पुरस्कार करण्यासाठी एखाद्या लेखकाच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे लेखक मराठीत सध्या आहेत तरी कुठे?
दुसरे म्हणजे संमेलनाध्यक्ष ही साहित्य क्षेत्रामध्ये अव्याहत काम करणारी व्यक्‍ती असते. अशा व्यक्‍ती हे मानाचे पद मिळण्याच्या आधी आणि नंतरही काम करत असतात. त्या विशिष्ट व्यक्‍तीने आजवर केलेल्या कामाची पावती म्हणूनच हे पद, हा सन्मान त्यांना मिळालेला असते. त्यामुळे संमेलनाध्यक्षाने अध्यक्षपद मिळाल्यानंतर काही वेगळे असे काम करण्याची अपेक्षा ठेवणे चूक आहे. संपूर्ण महाराष्ट्राला डोळ्यासमोर ठेवून संमेलनाध्यक्ष म्हणून मोठ्या व्यासपीठावर मिळालेली संधी आहे. लेखकाच्या बाबतीत लेखन ही त्याची कृती आहे. आता त्या लिहिण्याला नक्कीच वेगळ्या पद्धतीची जोड देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

(शब्दांकन : श्रीनिवास वारुंजीकर आणि कल्याणी फडके)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)