‘प्रभात’ विशेष: निलंबीत कर्मचाऱ्याकडेच मागविला खुलासा

पीएमपीचा पुन्हा ढिसाळ कारभार, कामगार न्यायालयात दाद मागण्याचा इशारा

प्रभात विशेष

पुणे, दि. 18 – पीएमपी प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. वर्षभरापूर्वी अपघातप्रकरणी निलंबित केलेल्या आणि न्यायालयात खटला प्रलंबित असताना प्रशासनाने त्याला चक्क गैरहजेरीची नोटीस बजाविली आहे. विशेष म्हणजे याबाबत येत्या आठ दिवसांत समाधानकारक खुलासा न केल्यास थेट निलंबनाची कारवाई करण्यात येइल, अशी तंबी या चालकाला देण्यात आली आहे. प्रशासनाने आयतेच कोलीत हाती दिल्याने या चालकाचे उखळ पांढरे झाले आहे. प्रशासनाने बजाविलेल्या या भक्कम नोटीशीच्या आधारे कामगार न्यायालयात दाद मागण्याचा इशारा या चालकाने दिला आहे.
हनुमंत विश्‍वनाथ शिंदे असे नोटीस बजाविण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. शिंदे हे पीएमपीच्या न.ता. वाडी डेपोत गेल्या काही वर्षांपासून हंगामी चालक म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान, 28 एप्रिल 2016 रोजी बसची एका वाहनचालकाला धडक बसली होती. त्यामध्ये या वाहनचालकाचा जागीच मृत्यु झाला. त्यामुळे त्याला अटक करुन जामीनावर सोडून देण्यात आले होते. त्यानंतर पीएमपी प्रशासनाने शिंदे यांना बडतर्फ केले. त्याशिवाय त्यांची खातेनिहाय चौकशी सुरु करण्यात आली होती. प्रशासनाच्या या निर्णयाच्या विरोधात शिंदे यांनी कामगार न्यायालयात दाद मागितली होती. त्याबाबत न्यायालयात सुनावणी सुरु असून त्यावर येत्या काही महिन्यातच निर्णय होण्याची शक्‍यता आहे.
दरम्यान, प्रशासनाने गेल्या आठवड्यात सातत्याने कामावर गैरहजर राहणाऱ्या 660 वाहक आणि चालकांना नोटीसा बजाविल्या आहेत. त्यांना कामावर गैरहजर राहण्याचा खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे. त्याबाबत समाधानकारक खुलासा न केल्यास सेवेतून थेट निलंबित करण्याची तंबी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रशासनाने कोणतीही खातरजमा न करता वर्षभरापूर्वी बडतर्फ करण्यात आलेल्या शिंदे यांनाही अशा प्रकारची नोटीस बजाविण्यात आली आहे.

याबाबत येत्या आठ दिवसांत समाधानकारक खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शिंदे यांच्या हातात आयतेच कोलीत सापडले आहे. त्यांनी प्रशासनाच्या या नोटीशीचा आधार घेत कामगार न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

अधिकारी आणि कर्मचारीही कारणीभूत…!
पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर कारवाईचा धडाका सुरु ठेवला आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे लेटलतिफ आणि कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कामगार, तसेच अधिकाऱ्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारची दहशत निर्माण झाली आहे. मात्र, प्रशासनात अद्यापही कामाची शिस्त आलेली नाही. गेल्या वर्षभरात सातत्याने गैरहजर राहणाऱ्या कामगारांना नोटीसा बजाविण्याचे आदेश मुंढे यांनी दिले होते. त्यानुसार हे कामगार अथवा अधिकाऱ्यांना नोटीशी बजाविताना त्याची खातरजमा करण्याची आवश्‍यकता होती. मात्र, अधिकारी आणि कामगारांच्या हलगर्जीपणाच्या कारभारामुळे बडतर्फ करण्यात आलेल्या शिंदे यांना नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे यांनी न्यायालयात दाद मागितल्यास प्रशासनाला त्याची जबर किंमत मोजावी लागण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

कर्मचारी वर्गाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसारच शिंदे यांना नोटीस बजाविण्यात आली आहे, बडतर्फ केले असतानाही शिंदे यांना अशा पध्दतीने कशी नोटीस बजाविण्यात आली याची तात्काळ माहिती घेण्यात येणार असून संबधित कर्मचाऱ्याला याचा जाब विचारण्यात येणार आहे. त्याबाबत येत्या दोन दिवसांतच योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे.
डी. पी. मोरे, सह व्यवस्थापकीय संचालक पीएमपीएमएल

अशा प्रकारच्या नोटीसा बजाविताना प्रशासनाने खातरजमा करण्याची आवश्‍यकता होती. मात्र, कामाचा वेग दाखविण्यासाठी काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही तत्परता दाखविली आहे. मात्र, आगामी काळात या तत्परतेची जबरदस्त किंमत प्रशासनाला मोजावी लागण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेऊन संबधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी.
अशोकराव जगताप, उपाध्यक्ष, पीएमटी कामगार संघ (इंटक)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)