‘प्रभात’ विशेष: नव्या मीटरसाठी ग्राहकांचे महावितरणकडे हेलपाटे

सदोष मीटरमुळे प्रशासनापुढे महासंकट, लक्षावधी मीटर नादुरुस्त

नाना साळुंके

पुणे केंद्रातील एका बडया नेत्याच्या मालकीच्या असलेल्या ” फ्लॅश’ आणि “रोलॅक्‍स’ या वीजमीटर बनविणाऱ्या कंपन्यांनी महावितरण प्रशासनाच्या समोर ” महा’ संकट उभे केले आहे, या कंपन्यांनी केलेल्या घोटाळयामुळे आणि नादुरुस्त वीजमीटरमुळे प्रशासनाच्या गळयाच्या भोवतीचा फास आणखीनच आवळत चालला आहे. या कंपन्यांनी वीजकंपनी प्रशासनाला तब्बल पंधरा ते वीस लाख सदोष वीजमीटर पुरविल्याची ” धक्का’ दायक बाब उघडकीस आली आहे, त्यातील बहुतांशी वीजमीटर हे फास्ट असल्याने वीज ग्राहकांच्या वीजबीलात तब्बल वीस ते पंचवीस टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. त्याशिवाय काही वीजमीटर हे स्लो असल्याने प्रशासनाला महिन्याकाठी लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे, तसेच नादुरुस्त वीजमीटर बदलून देण्यासाठी ग्राहकांनी तगादा लावला आहे. मात्र, त्यासाठी वीजमीटरच उपलब्ध नसल्याने प्रशासनाची डोकेदुखी आणखीनच वाढली आहे.

गेल्या काही वर्षांच्या कालावधीत महावितरणच्या कामाचा ताण चांगलाच वाढला आहे, त्यातच शहराच्या आणि ग्रामीण भागाच्या नागरीकरणातही कमालीची वाढ झाल्याने वीजेची मागणी आणि नव्या वीजजोडाच्या मागणीतही वाढ झाली आहे. मात्र, हे वास्तव असतानाच प्रशासनाकडे असलेले मनुष्यबळ खूपच कमी आहे. त्याशिवाय कामगारांच्या नव्याने करण्यात येणाऱ्या भरतीवरही निर्बंध लादण्यात आले आहेत, त्यावर पर्याय म्हणून वीजमीटरसह अन्य कामाचा ” भार’ खासगी ठेकेदारांवर सोपविण्यात आला आहे. त्यानुसार सर्व प्रकारच्या वीजमीटरचा पुरवठा करण्याचे काम खासगी कंपनीला देण्यात येत आहे, पहिल्या टप्प्यामध्ये या वीजमीटरच्या पुरवठयामध्ये पारदर्शीपणा होता. हे मीटर योग्य पध्दतीने चालत असल्याने आणि वीज ग्राहकांना या वीजमीटरमध्ये फेरफार करणे शक्‍य होत नसल्याने त्याबाबत ग्राहकांच्या कोणत्याही तक्रारी येत नव्हत्या, त्याशिवाय महावितरणच्या महसूलातही प्रचंड वाढ झाली होती.

मात्र, गेल्या दोन ते तीन वर्षांच्या कालावधीत महावितरण प्रशासनाच्या या पारदर्शी कारभाराला अक्षरश: ग्रहण लागले आहे. राज्यातील सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांना वीजमीटर पुरविण्याचा ठेका
केंद्रातील एका बडया नेत्याच्या मालकीच्या असलेल्या ” फ्लॅश’ आणि “रोलॅक्‍स’ या वीजमीटर बनविणाऱ्या कंपन्यांना देण्यात आले होते, हा ठेका मिळाल्यानंतर या कंपन्यांनी महावितरण प्रशासनाला चांगल्या दर्जांच्या वीजमीटरचा पुरवठा केला होता. या दरम्यानच प्रशासनाचा विश्‍वास संपादन केल्यानंतर या कंपन्यांनी सदोष वीजमीटर पुरविण्यास सुरुवात केली आहे, या कंपन्यांनी या कालावधीत प्रशासनाला पुरविण्यात आलेल्या मीटरपैकी तब्बल पंधरा ते वीस लाख वीजमीटर हे निकृष्ठ दर्जाचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे वीजमीटर फास्ट असल्याने सर्व प्रकारच्या ग्राहकांच्या वीजबीलामध्ये तब्बल वीस ते पंचवीस टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे, त्याशिवाय काही वीजमीटरचे सरासरी रिडिंग घ्यावे लागत असल्याने प्रशासनालाही महिन्याकाठी लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. परंतु नादुरुस्त असलेले वीजमीटर बदलून देण्यासाठी प्रशासनाकडे वीजमीटरच उपलब्ध नसल्याने प्रशासनाच्या संकटामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत असून या संकटातून लवकरच मार्ग निघेल असा दावा महावितरण प्रशासनातील सूत्रांनी ” प्रभात’ शी बोलताना केला.

आणखी दीड वर्षांचा कालावधी लागणार ?

या पुरवठादार कंपन्यांनी पुरवठा केलेले तब्बल पंधरा ते वीस लाख वीजमीटर सदोष असल्याने प्रशासनाच्या समोर नवा पेच उभा ठाकला आहे, नादुरुस्त वीजमीटर बदलून देताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातूनच नव्या वीज ग्राहकांच्या वेटिंगची संख्या वाढतच चालली आहे, त्याची गंभीर दखल घेऊन प्रशासनाने वीजमीटरचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना जादा वीजमीटरचा पुरवठा करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. मात्र, मागणी आणि पुरवठा यांच्यामध्ये कमालीची तफावत निर्माण झाल्याने ही परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी किमान दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागेल अशी माहितीही सूत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)