प्रभातच्या वार्ताहराला पोलिसांची मारहाण

वाई पोलिसांचा अजब कारभार:पत्रकार संघटनांकडून निषेध

सातारा, दि. 5 (प्रतिनिधी) – वाई बसस्थानकात युवकांच्या हाणामाऱ्याचे प्रकार नवीन नाहीत.सोमवारी देखील बसस्थानकात अशाच प्रकारे युवकांच्या दोन गटात राडा झाला.त्याचवेळी बसस्थानकात वार्तांकनासाठी गेलेल्या दैनिक प्रभातचा वार्ताहर समीर मेंगळे याला पोलिसांनी भांडणाशी काहीही संबंध नसतानाही अमानुष मारहाण केली.वाई पोलिसांचा चोर सोडून संन्याशाला फाशीचा हा अजब कारभार पाहून पत्रकारांनी तीव्र संताप व्यक्त केला असून तीव्र संघटनांनी तीव्र निषेध केला आहे.
काहीही संबंध नसताना पत्रकार मेंगळे याला वाई पोलीस ठाण्यातील बबन येडगे या अधिकाऱ्याने नाहक अपशब्द वापरुन पोलीस ठाण्यात नेले. तसेच त्याठिकाणी नेऊन त्याला आठ पोलिसांनी कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याची घटना घडली आहे. “चोर सोडून संन्याशलाच फाशी’ अशी भूमिका घेणाऱ्या वाई पोलिसांचा अजब कारभार या निमित्ताने चव्हाट्यावर आला असून शिस्तप्रिय जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख या प्रकरणी लक्ष घालणार का? तसेच संबंधित कर्तव्याची जाण विसरलेल्या पोलिसांना शिस्तीचे धडे देणार का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
वाई बसस्थानकात वारंवार युवकांच्या हाणामारीच्या घटना घडत असतात. मात्र, हे युवक बऱ्याचदा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार होतात. त्यानंतर या प्रकरणांवर पडदा पडतो. संबंधित टवाळखोर युवकांना शोधण्याची तसदीही पोलीस घेत नाहीत. याशिवाय शहरातील आठवडी बाजारात चोरीच्या घटना घडण्याचे प्रमाणही मोठे आहे. याप्रकरणी वृत्तपत्रांमधूनही वारंवार बातम्या प्रसिद्ध होत असतात, मात्र, तरीही पोलिसांना हे चोरटे शोधण्यात अद्यापपर्यंत यश आलेले नाही. याशिवाय वाई शहरातील क्राईमरेटही वाढत असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांनी एका निर्दोष पत्रकाराला कपडे फाटेपर्यंत मारहाण केली आहे.युवकांच्या दोन गटात राडा झाल्यानंर पोलीस त्याठिकाणी दाखल झाले. तोपर्यंत संबंधित राडा करणारे युवक पसारही झाले होते. मात्र,बबन येडगे या अधिकाऱ्याने मुतारीमध्ये असलेल्या या पत्रकाराला कॉलर धरुन बाहेर आणले आणि त्याला पोलीस ठाण्यात नेले. या भांडणाशी माझा काहीही संबंध नसल्याचे आणि आपण पत्रकार असल्याचे संबंधित युवकाकडून वारंवार सांगितले जात होते. मात्र, त्याचे काही न ऐकता त्या पोलीस अधिकाऱ्यासह आठ पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या युवकाला कपडे फाटेपर्यंत मारहाण केली आहे. या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आलाच आहेत. परंतु, पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)