‘प्रभात’चा प्रभावः ‘त्या’ अधिकाऱ्यांना घरी पाठविण्याचे आदेश

महावितरणच्या महाघोटाळ्याची उर्जामंत्र्यांकडून गंभीर दखल

पुणे – बांधकाम व्यवसायिकांवर ” मेहेरनजर’ करणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीच जोरदार ” झटका’ देत, पुणे परिमंडळाच्या पर्वती विभागाच्या अखत्यारीत घडलेल्या तब्बल दोनशे कोटीहूनही अधिकच्या महाघोटाळयाची गंभीर दखल घेतली आहे. या घोटाळयाची येत्या महिनाभरात चौकशी करुन संबधित अधिकाऱ्यांना ” घरचा रस्ता दाखवा ‘ असा जाहीर आदेश दिला. एवढ्या मोठ्या घोटाळयाची दखल न घेणाऱ्या प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे आणि मुख्य अभियंता रामराव मुंडे यांची ” हजेरी’ घेत, या घोटाळे बहाद्दर अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याने तुमची विश्‍वासार्हता कमी झाली आहे अशा जाहीर कानपिचक्‍याच देत उर्जामंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आणि या महाघोटाळयाचा ” पोलखोल’ केला. उर्जामंत्र्यांच्या या आदेशामुळे या महाघोटाळयाला वेगळेच वळण मिळाले आहे, त्याशिवाय या महाघोटाळयात अडकलेल्या संबधित अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

वीज ग्राहकांच्या तक्रारी आणि समस्या जाणून घेण्यासाठी महावितरण प्रशासनाच्या वतीने गुरुवारी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ग्राहकांच्या समस्या जाणून घेतल्या. महावितरणचे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे, मुख्य अभियंता रामराव मुंडे, अधीक्षक अभियंता सुनिल पावडे, महेंद्र दिवाकर, सुंदर लटपटे आदी याप्रसंगी उपस्थित होते. त्यावेळी या महाघोटाळयाचा सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या दैनिक ” प्रभात’ ची कात्रणे दाखवत जन आधार सेनेचे संस्थापक अध्यक्ष शरद चव्हाण यांनी या महाघोटाळयाचा पर्दाफाश केला, त्याची गंभीर दखल घेत बावनकुळे यांनी या महाघोटाळयाचा पर्दाफाश करत अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.

राज्य विद्युत नियामक आयोग आणि महावितरण प्रशासनाच्या निकषानुसार मोठ्या इमारती उभारणाऱ्या बांधकाम व्यवसायिकांसाठी काही नियम तयार करण्यात आले आहेत. या नियमानुसार वीजजोड मिळविण्यासाठी या व्यवसायिकांनी ट्रान्सफार्मर आणि त्या क्षमतेचा फिडर उभारणे, वीजवाहिन्या टाकणे तसेच अन्य वीजयंत्रणेशी संलग्न असणाऱ्या अन्य पायाभूत सुविधा उभारण्यासाठी स्वत: खर्च करणे आवश्‍यक असते. या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश महावितरणच्या मुख्य कार्यालयाने राज्यातील सर्व परिमंडलांना दिले आहेत, या नियमांचा भंग़ केल्यास संबधितांवर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई करण्याची तरतूदही या कायद्यामध्ये करण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षांच्या कालावधीत सिंहगड रस्त्यावरील धायरी, वडगांव, कोल्हेवाडी, किरकटवाडी, नऱ्हे आंबेगाव येथे मोठ्या संख्येने गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या आहेत. राज्य वीज नियामक आयोग आणि महावितरण प्रशासनाच्या निकषानुसार या पायाभूत यंत्रणा उभारण्यासाठी संबधित बांधकाम व्यवसायिकांनी हा खर्च करणे आवश्‍यक होते. मात्र, पर्वती विभागातील अधिकाऱ्यांनी संबधित बांधकाम व्यवसायिकांवर मेहेरनजर दाखवित महावितरण प्रशासनाच्या खर्चातून त्यांना पायाभूत यंत्रणा उभारुन दिली आहे. या माध्यमातून गेल्या सात ते आठ वर्षांच्या कालावधीत दोनशे कोटीहून अधिकचा घोटाळा घडला आहे, या महाघोटाळा उघडकीस येताच महावितरण प्रशासन विशेषत: पुणे परिमंडलामध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.

या महाघोटाळयाचा दैनिक ” प्रभात’ ने सातत्याने पाठपुरावा केला होता, त्याशिवाय थेट राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना हा महाघोटाळा निदर्शनास आणून दिला होता. त्याची गंभीर दखल घेत बावनकुळे यांनी प्रादेशिक संचालक कार्यालयाला या महाघोटाळयाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार प्रादेशिक संचालक कार्यालयाने केलेल्या चौकशीत या महाघोटाळयामध्ये तब्बल बारा अधिकारी दोषी असल्याचे निष्पन झाले होते. मात्र, ही चौकशी पूर्ण होउन तब्बल दोन महिन्यांचा कालावधी उलटला असतानाही या अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे स्थानिक अधिकारी या महाघोटाळयातील अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचे स्पष्ट झाले होते. आज उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या जनता दरबारामध्ये जन आधार सेनेचे अध्यक्ष शरद चव्हाण यांनी या महाघोटाळयाचा पर्दाफाश केला.

हा महाघोटाळा उघडकीस आला असताना आणि त्याचे पुरावे उपलब्ध असतानाही प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे आणि मुख्य अभियंता रामराव मुंडे हे घोटाळेबाज अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा घणाघाती आरोप चव्हाण यांनी केला. चव्हाण यांच्या या आरोपाची गंभीर दखल घेत बावनकुळे यांनी ताकसांडे आणि मुंडे यांना चांगलेच फैलावर घेत त्यांची कानउघाडणी केली, तसेच गुन्हेगारांना पाठीशी घातल्याने तुम्ही विश्‍वासार्हताच गमावली असा थेट हल्लाबोल बावनकुळे यांनी ताकसांडे आणि मुंडे यांना उद्देशून केला. ही बाब गंभीर असून येत्या महिनाभरात ही चौकशी पूर्ण करुन घोटाळेबाज अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करा, असे आदेशच त्यांनी दिले. यामध्ये हयगय केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशाराही बावनकुळे यांनी दिला.

शेर झाले ढेर…!

जनता दरबाराच्या प्रारंभीच बावनकुळे यांनी रुद्रावतार धारण करुन प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे, मुख्य अभियंता रामराव मुंडे यांना चांगलेच फैलावर घेतले. त्यामुळे तक्रारदार नागरिकांनाही काहीअंशी दिलासा मिळाला, त्यामुळे ग्राहकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्याची दखल घेत बावनकुळे यांनी पिरंगुट येथील एका अधिकाऱ्याचे निलंबन करण्याचे आदेश जारी केले. त्याशिवाय अन्य अधिकाऱ्यांनाही तंबी देत महाराष्ट्राचा नकाशा पाहिलात का, थेट चंद्रपूर आणि गडचिरोलीलाच बदली करतो असा दमच भरला. त्यामुळे एरव्ही ग्राहकांसमोर शेर असणारे वरिष्ठ अधिकारीही अक्षरश: ढेर झाले आणि कारवाई टाळण्यासाठी गयावया करु लागले, त्यामुळे उपस्थितांची चांगलीच करमणूक झाली. विशेष म्हणजे जनता दरबार असूनही प्रशासनाचा ड्रेसकोड न पाळणारे अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय घोडके यांच्या दोन वेतनवाढ रोखण्याचे आदेशच बावनकुळे यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)