प्रभाग समिती 24 स्वीकृत सदस्य पदांसाठी 121 जण रिंगणात

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग समितीवर 24 स्वीकृत सदस्यांची वर्णी लागणार असून यासाठी निवडणुकीच्या रिंगणात एकूण 121 उमेदवार उतरले आहेत. पालिकेच्या आठही प्रभागांत सत्ताधारी भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार निवडून येणे निश्‍चित मानले जात आहे. कोणाला संधी द्यायची यावरुन सत्ताधारी भाजपमध्ये सध्या धुसफूस सुरु आहे. विशेष म्हणजे प्रभाग समितीवर वर्णी लावण्यासाठी भाजपच्या माजी नगरसेवकांनी देखील अर्ज केले आहेत. प्रभाग समितीच्या 26 एप्रिल रोजी होणाऱ्या विशेष सभेत स्वीकृत सदस्यपदासाठी निवडणूक घेतली जाणार आहे.

मिनी महापालिका असा दर्जा मिळालेल्या प्रभाग समित्यांना महापालिका राजकारणात महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त होत आहे. या प्रभाग समितींमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय होतात. नागरिकांच्या दैनंदिन प्रश्‍नांचे निवारण देखील या ठिकाणी शक्‍य होत असल्याने राजकीयदृष्टया प्रभाग समितींचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे प्रभाग समितींवर जाण्यासाठी चढाओढ सुरु झाली आहे. महापालिकेची आठ प्रभाग कार्यालये आहेत. प्रत्येक प्रभाग समित्यांसाठी स्वयंसेवी संस्थांचे तीन प्रतिनिधी स्वीकृत सदस्य म्हणून निवडले जातात. मात्र, येथे देखील राजकीय कार्यकर्त्यांचेच पुनर्वसन केले जाते. प्रभाग कार्यालयांकडे येणाऱ्या अर्जांमधून त्यांची निवड केली जाते. यासाठी महापालिका आयुक्‍त एका अधिकाऱ्यालाही प्राधिकृत करतात.

महापालिकेने स्वीकृत सदस्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करुन अर्ज मागविले होते. “अ’ प्रभागात 19, “ब’ 27, “क’ 15, “ड’ 10, “ई’ 7, “फ’ 16, “ग’ 15 आणि “ह’ 12 असे अर्ज प्राप्त झाले. वैध-अवैध अर्जांची यादी अवैधतेच्या कारणांसह 13 एप्रिल रोजी प्रभाग कार्यालयांच्या सूचना फलकांवर प्रसिद्ध करण्यात आली. 160 पैकी 121 वैध ठरले आहेत. वैध ठरलेले अर्ज प्रभाग समितीच्या 26 एप्रिल रोजी होणाऱ्या विशेष सभेत ठेवण्यात येणार असून निवडणूक घेतली जाणार आहे. या पदासाठी आपली वर्णी लागावी म्हणून उमेदवारांनी आपल्या राजकीय गॉडफादरकडे लॉबिंग करण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरु केले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)