प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतरंगात…

हक्काचे घर असणे हे सर्वांचेच स्वप्न असते. हे स्वप्न साकार करण्यासाठी व्यक्ती आयुष्यभर मेहनत करतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून घराच्या वाढत्या किंमती पाहता वन बीएचके फ्लॅट खरेदी करणे देखील सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर गेले आहे. गावकडची जमीन, सोने-चांदी विकूनही महानगरात घर खरेदी करणे अशक्‍यप्राय बाब ठरत आहे. उत्पन्न कमी असेल तर बॅंकाही कर्ज देण्यास टाळाटाळ करतात किंवा त्याचे प्रमाणही कमी असते. यातून घर खरेदीचे दिव्य पार पाडणे जिकरीचे होऊन बसते.

विशेषत: आवडीच्या ठिकाणी किंवा सोयीच्या ठिकाणी घर खरेदी करायचे असेल तर आपल्या खिशाला अधिकच चाट बसतो. त्यामुळे तडजोड करून गावाबाहेर किंवा महानगरलगत परिसरात घर खरेदी करून संबंधित व्यक्ती घराचे स्वप्न साकार करतो. अशा स्थितीत पंतप्रधानांची परवडणाऱ्या घरांची योजना ही उपयुक्त ठरत आहे. विकासक, बॅंका देखील पंतप्रधानांच्या योजनांना प्रोत्साहन देत असल्याने सामान्यांना घर खरेदीचा विचार अंमलात आणणे शक्‍य होताना दिसून येत आहे. देशातील सर्वच महानगरात, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर प्रधानमंत्री आवास योजना राबविली जात असून आतापर्यंत हजारो लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

काही नियम आणि अटींवर आधारित असलेली योजना सामान्यांना उपकारक ठरत आहे. विशेष म्हणजे या योजनेर्तंगत प्रथमच घर खरेदी करणाऱ्यांना काही नियम आणि अटींच्या आधारावर क्रेडिट लिंक्‍ड सबसिडी प्रदान केली जात आहे. सर्वत्र घरांच्या किंमती गगनाला भिडलेल्या असताना ही योजना एकप्रकारे संजीवनी ठरत आहे, असे म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही. अर्थात या योजनेबाबत अद्याप पुरेशी माहिती नसल्याने त्याचा लाभ घेण्यापासून अनेक मंडळी वंचित आहेत. म्हणूनच पंतप्रधान गृहकुल योजना म्हणजे नेमके काय यासंदर्भात इर्थ माहिती देता येईल.

साधारणत: एक दोन वर्षापूर्वी सर्वांना घर उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजांपैकी एक असणारे घर व्यक्तीला केवळ आश्रय देत नाही तर व्यक्तींची भावनिक गरज देखील पूर्ण करण्याचे काम करते. शारिरीक, मानसिक आणि भावनिक आधार देण्याचे काम घर करत असते. सध्याच्या काळात घरांची वाढती निकड लक्षात घेता प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत काही श्रेणीनुसार घर घेणाऱ्यांना गृहकर्जाच्या व्याजावर भरभक्कम सबसिडी दिली जात आहे.

या योजनेनुसार पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यांना काही अटी पूर्ण केल्यास क्रेडिट लिंक्‍ड सबसिडी दिली जात आहे. घरांच्या वाढत्या किमतीवर मात करण्यासाठी काही जणांसाठी ही योजना संजिवनी ठरली आहे. या योजनेसंदर्भात अनेकांना अचूक माहितीचा अभाव आहे. या योजनेशी निगडीत असलेल्या महत्त्वाच्या गोष्टी इथे नमूद करता येतील.

लाभार्थी: जानेवारी 2017 मध्ये प्रसिद्ध केलेल्या नवीन अधिनियमानुसार या योजनेतंर्गत प्रथमच घर खरेदी करणारा व्यक्ती पात्र असणार आहे. त्याचबरोबर कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर देशभरात पक्के घर नसावे. लाभार्थी कुटुंब म्हणजे पती, पत्नी तसेच अविवाहीत मुलगा असे गृहित धरलेले आहे.

नियम: पत्नी आणि पती संयुक्तपणे गृहकर्जासाठी अर्ज करू शकतात. मात्र अशा स्थितीत सबसिडी केवळ एकदाच दिली जाईल. जर दोहोपैकी एकाने सरकारच्या अन्य घरकुल योजनेचा लाभ घेतला असेल तर गृहकर्जावर सबसिडी मिळणार नाही.

उत्पन्न: जर एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न वार्षिक तीन लाख रुपये असेल तर त्याला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (इकोनॉमिकली विकर सेक्‍शन इ.डब्ल्यू.एस) नुसार अर्ज करू शकतो. तीन ते सहा लाख रुपये वार्षिक उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम उत्पन्न श्रेणीत (लोअर इन्कम ग्रुम एलआयजी) नुसार अर्ज करू शकतात. तर सहा ते 12 लाख रुपयांपर्यतच्या उत्पन्नातील व्यक्ती वर्ग-1 (मिडल इन्कम ग्रुप- एमआयजी 1) नुसार अर्ज करू शकता. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 18 लाखांपर्यंतचे आहे ते मध्यम आय वर्ग-2 (मिडल इन्कम ग्रुप-2-एमआयजी-2) नुसार अर्ज करू शकतात.

घर: सबसिडी किंवा अंशदान ही घर खरेदी केल्यावरच लागू होते. मग ते घर बांधकामअवस्थेतील असो, रेडी पझेशन असो किंवा स्वत: बांधलेले असो. सध्याच्या स्थितीत वाढवलेल्या घराच्या भागाच्या कामासाठी देखील अंशदानाची ही योजना लागू होते.

आकार: इडब्ल्यूएस श्रेणीनुसार घराचा अधिकाधिक कार्पेट एरिया 30 चौरस मीटर (सुमारे 323 चौरस फुट)पेक्षा अधिक नसावा. एलआयजी श्रेणीतील घराचा कार्पेट एरिया 60 चौरस मीटर, एमआयजी-1 श्रेणीतील 90 चौरस मीटर आणि एमआयजी-2 श्रेणीतील नागरिकांसाठी 110 चौरस मीटरपर्यंत घराचा आकार असावा. जर घराचा आकार वरीलपेक्षा मोठा असला तरीही सबसिडी मिळू शकते, मात्र सरकारी नियमानुसार निश्‍चित केलेल्या आकारापर्यंतच सबसिडी मिळेल.

अंशदान (सबसिडी): ईडब्ल्यूएस तसेच एलआयजी श्रेणीतील नागरिकांसाठी 6 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्तीत जास्त 20 वर्षाच्या कालावधीच्या कर्जावर 6.5 टक्के सबसिडी मिळेल. जर या निश्‍चित केलेल्या रकमेपेक्षा गृहकर्ज घेतले तर सबसिडी मात्र 6 लाख रुपयांच्या व्याजावरच मिळेल. अतिरिक्त पैशांवरचे संपूर्ण व्याज लाभार्थ्याला द्यावे लागेल. उदा. जर एखाद्याने दहा लाख रुपये गृहकर्ज घेतले असेल आणि त्याचे व्याज 9 टक्के वार्षिक असेल तर 6 लाखांपर्यतचे कर्ज अडीच टक्के (9-6.5=2.5%) व्याजदराने आकारले जाईल. उर्वरित 4 लाख रुपयांवर 9 टक्के दराने व्याज द्यावे लागेल. एमआयजी-1 वर्गातील नागरिकांसाठी 9 लाखांपर्यंत गृहकर्जाच्या व्याजात 4 टक्‍क्‍यांची सबसिडी मिळेल.

सर्व श्रेणीतील गृहकर्जाचा अधिकाधिक कालावधी 20 वर्षे निश्‍चित केला आहे. ईडब्ल्यूएस तसेच एलआयजी श्रेणीप्रमाणेच अन्य श्रेणीतील नागरिक देखील मर्यादेपेक्षा अधिक गृहकर्ज घेऊ शकतात आणि त्यावरही निश्‍चित केलेलीच सबसिडी मिळू शकते.

गृहकर्ज: आपण प्रधानमंत्री आवास योजनेच्या नियमांचे, अटींचे भलेही पालन केले असेल तरीही गृहकर्जासंबंधी अन्य काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. गृहकर्ज आपल्याला आपल्या पातळीपर्यंत घ्यावे लागेल. काही बॅंका आपल्या गृहकर्जासाठी निश्‍चित नियमानुसार आपली पात्रता तपासूनच कर्ज देईल. वय, शैक्षणिक पात्रता, अवलंबून असणाऱ्यांची संख्या, पती-पत्नीचे उत्पन्न, बचतीचा इतिहास, सध्याच्या काळातील जबाबदाऱ्या जसे की, सध्यस्थितीतील कर्जाच्या हप्त्याची माहिती, नोकरीची स्थिती आदी गोष्टींवर विचार केल्यानंतरच बॅंक आपल्याला गृहकर्ज उपलब्ध करून देईल.

गुणोत्तर प्रमाण: कर्ज देणारा लोन टू व्हॅल्यू रेशो देखील लक्षात ठेवेल. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास जोपर्यंत आपण डाऊनपेमेंट करणार नाही, तोपर्यंत बॅंक कर्ज देणार नाही. बहुंताशी प्रकरणात घराच्या एकूण किंमतीपैकी 15 ते 20 टक्‍क्‍यांपर्यंत रक्कम डाऊनपेमेंट करावे, अशी अपेक्षा केली जाते.

अर्ज:गृहकर्जासाठी अर्ज करताना आपल्याला सेंट्रल नोडल एजन्सीचा अर्ज भरावा लागणार आहे. बॅंकांकडून गृहकर्ज मंजूर झाल्यानंतर त्यास हुडको (हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) किंवा एनएचबी (नॅशनल हाऊसिंग बोर्ड) कडे पाठवले जाईल. त्यानंतर गृहकर्जाच्या रक्कमेला सबसिडी दिली जाईल आणि त्यात सरकारी बॅंक एकरकमी रक्कम जमा करेल.

लाभ: या योजनेत मिळणाऱ्या सबसिडीच्या मदतीने कर्जाची मूळ रक्कम कमी होते. लाभार्थ्याकडे हप्त्याची रक्कम कमी करण्याचा देखील पर्याय असतो. अशा स्थितीत गृहकर्जाचा कालावधी कमी होणार नाही. या सबसिडीमुळे लाभार्थ्याची बऱ्यापैकी बचत होते आणि गृहकर्ज घेणाऱ्यांवरचा आर्थिक ताण काही प्रमाणात कमी होईल.

कमलेश गिरी 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)