प्रदेशाध्यक्षांनी रणशिंगातून फुंकले वारे…

वारे इकडून तिकडे जाणार की जिल्हा पेटवणार..?

सातारा जिल्ह्याच्या राजकारणातली मरगळ कधी जाणार आणि खरोखर विकासाच्या मुद्यांवर राजकारणाची गाडी कधी वेग धरणार याकडे सातारकर डोळे लावून बसले आहेत.प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा नुकताच झालेला सातारा दौरा खरे तर राजकारणाला आलेल्या मरगळीला किती झटकतो हे पहाण्यात सातारकरांना रस आहे.होता.मात्र त्यांच्या दौऱ्या नंतर फारकाही घडेल असे वाटत नाही.निदान तशी चिन्हे सध्यातरी दिसत नाही. बुथ व्यवस्थापनाचा मुद्दा महत्वाचा असल्याचे सांगून प्रदेशाध्यक्षांनी अंतर्गत मतभेदांवर थेट काही भाष्य , कृती करायचे टाळले. प्रत्येक मतदार संघातील , प्रत्येक प्रस्थापिताचा गड अबाधित आहे . त्याला कोणी हात लावू शकत नाही, अशा वातावरणात सध्या जिल्ह्यातील सर्व मतदार संघातील लोकप्रतिनिधी असल्याने चर्चा ,बैठका होत असल्या तरी त्या किती गांभीर्याने घ्यायच्या हे जो तो आपापल्या प्राधान्यक्रमाने ठरवतो आहे. सहाजिकच आपापल्या गढ्या राखणे एवढे काम मनापासून केले की आपल्याला कोणी धक्का लावू शकत नाही अशा ठाम समजात ही मंडळी आहे. प्रदेशाध्यक्षांनी फुंकले वारे रणशिंगातून जात जिल्हा पेटवणार का ती फुंकर नळीतून मग इकडून तिकडे जाणार हे पहाणे उत्सुकतेचे आहे.

सातारा जिल्हा हा एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. राष्ट्रवादीच्या निर्मिती नंतर हा बालेकिल्ला राष्ट्रवादीचा झाला. राज्यात राष्ट्रवादीला सर्वाधिक हात या जिल्ह्याने दिला. अगदी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी या पक्षाची स्थापना केल्याचे जाहीर करताच कोणताही विचार न करता पाटणचे तत्कालिन आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी पहिल्यांदा त्यांना पाठिंबा जाहीर केला होता.आणि राष्ट्रवादीची लाट स्व.आमदार अभयसिंहराजे भोसले यांच्या प्रवेशा नंतर सातारा जिल्ह्यात थांबली. थांबली यासाठी कि त्या नंतर राष्ट्रवादीत जाण्यासारखा मोठी वलयांकीत व्यक्ती अपवाद वगळता कॉंग्रेसमध्ये राहीली नव्हती. त्या नंतरच्या लोकसभा निवडणुकीत कराडला श्रीनिवास पाटील यांनी इतिहास घडवला. घराण्याची पुण्याई, पक्षीय कार्यकर्तृत्वाची मोठी परंपरा असलेल्या आणि विशेष म्हणजे गांधी घराण्याशी जवळीक असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादीने जोपर्यंत कराड लोकसभा मतदार संघ होता तो पर्यंत जिल्ह्यातून दोन खासदार निवडून दिले. त्या नंतर साताऱ्यातून राष्ट्रवादीने आपला वरचष्मा लक्ष्मणराव पाटील आणि उदयनराजे भोसले यांच्या ताकदीने कायम ठेवला. जिल्ह्यातील महत्वाच्या आर्थिक , सहकारी, कृषी , राजकीय सत्ता स्थानांवर आपली पकड दिवसेंदिवस मजबूत केली. आज या या सत्तास्थानांमूळे राष्ट्रवादी भक्कम तर आहे. या संस्था ज्यांच्या ताब्यात आहेत ती मंडळी ही सत्तेच्या केंद्र भागी आहेत. अशा परिस्थीतीत प्रदेशाध्यक्ष कोणाला कान पिचक्‍या देणार आणि कोणाला कसला उपदेश करणार ? या परिस्थीतीत महत्वाचा मुद्दा आहे तो पक्षांतर्गत मतभेद दूर करण्याचा . त्यावर मात्र कोणी ही स्पष्ट आणि सडेतोड भूमिका घेण्याचे धाडस करणार नाही. जिल्ह्यात राहिलेल्या लोकसभेच्या एका जागेवर कोण ? या प्रश्‍नाला अनेकदा उत्तरे देण्याचा प्रयत्न झाला.कधी आडून तर कधी थेट पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या पर्यंत जावून घेण्याचा झाला. जिल्हा परिषद , नगर पालिका निवडणुका, जिल्हा मध्यवर्ती बॅंक एवढेच काय विधान परिषदेच्या निवडणुकीत ही पक्षात असलेली दुफळी समोर आली. पण यावर करणार काय ? हा प्रश्‍न ही उनुत्तरीत राहीला.
खा.उदयनराजे भोसले यांनी आपल्या पध्दतीने , आपल्या मतदारांसाठी काम करत असल्याचा विचार वारंवार मांडला. काही महिन्यांपूर्वी त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात श्री.शरद पवार यांच्या समोर आपण जनतेसाठी बारा महिने चोविस तास कार्यरत असू असे सांगून आपली कार्यपध्दती कोणासाठी , कशी आहे हे स्पष्ट केले. त्यांच्या वाढदिवसाला जे आमदार आले नाहीत त्यांच्या साठी खासदार भोसले यांना जे काही करायचे त्याचे मार्ग त्यांना मोकळे आहेत. आता तर मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून खा.उदयनराजे भोसले राज्यव्यापी नेतृत्व होत आहे. त्यांना मानणाऱ्या समुहात, व्यक्तीमध्ये वाढ होत आहे. राष्ट्रवादीच्या प्रचंड मतानी निवडून आलेल्या खासदरांमध्ये त्यांचा क्रमांक खुप वरचा असल्याने ते नि:संशय जननायक आहेत हे मान्य करण्याशीवाय गत्यंतर नाही. पक्षाला अशी नक्की निवडून येणारी जागा सोडयची नाही. अगदीच वेळ आली तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पुण्याच्या जागे बदल्यात साताऱ्याची जागा कॉंग्रेसला देईल अशी शक्‍यता व्यक्त केली जाते. कॉंग्रेसला सातारा जिल्ह्यासाठी माजी आमदार मदन भोसले किंवा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या पैकी कोणाची तरी निवड करावी लागेल. अर्थात राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते हे मान्य करतील का ? स्वतः खासदारांचा गट हे मान्य करेल का ? त्या नंतर येणाऱ्या विधान सभेच्या निवडणुकीवर या निर्णयाचे पक्षाच्या दृष्टीने किती सकारात्मक परिणाम होतील ? आणि एवढे करून खा. उदयनराजे भोसले हे मान्य करतील का हे प्रश्‍न आहेत. राष्ट्रवादीच्या जिल्हा चाणक्‍यांना खासदार उदयनराजे यांना थोपवायचे असेल तर हे कितपत जमेल ? कारण खा. भोसले यांना जेवढे दाबण्याचा प्रयत्न केला जातो त्या पेक्षा दुप्पट ताकदीने ते उसळी घेतात हा आज पर्यंतचा अनुभव आहे. सहाजिकच राष्ट्रवादीने कॉंग्रेस बरोबर आघाडी केली आणि जागा बदल केले ही शक्‍यता गृहित धरली आणि साताऱ्याची जागा कॉंग्रेसला दिली तरी खासदार उदयनराजे अपक्ष म्हणून इतर पक्षातील आपल्या मित्रांची मदत घेतऊन निवडणूक रिंगणात आव्हान देतीलच यात शंका नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला केवळ एका हाताच्या बोटांवर मोजण्या एवढ्या जागा मिळाल्या होत्या. त्यातील खा.धनंजय महाडिक . खा. उदयनराजे आणि खा. सुप्रिया सुळे या पुणे ते कोल्हापूर या पट्ट्यातील आहेत . बाकी महाराष्ट्रात या पुढे तेवढ्याच जागा मिळवणे हे देखिल राष्ट्रवादीला आव्हान असेल . शिवाय लोकसभे नंतर विधान सभा निवडणूक असल्याने त्या निवडणुकीत खा. भोसले यांची भूमिका प्रत्येक मतदार संघात नक्कीच महत्वाची असेल. या सगळ्याचा विचार करता जागा बदल करणे ही कितपत फायद्याचे ठरणार यावरही पक्षातील विचारवंतांमध्ये खल होईल. एक नक्की सातारा जिल्ह्यातील भाकरी करपणार नाही याची काळजी पक्षाध्यक्ष नक्कीच घेतील . तवा पण नवा आणतील , मात्र पक्षात परस्परांमध्ये ज्या लक्ष्मणरेषा आखल्या गेल्या आहेत त्या सामोपचारने मिटवल्या गेल्या तर जिल्ह्यातील रामराज्याचा झालेला उदय कधीच अस्तंगत होणार नाही.

 

 

 

भाजपचे सूत्र राष्ट्रवादीचे आचरण
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सातारा दौऱ्यात बुथ व्यवस्थापनावर भर दिला. अनेकांना अपेक्षा, उत्सुकता होती ती खासदारकीच्या उमेदवारी बद्दल किंवा लोकसभेच्या निवडणुकी बद्दल ! पण ही उत्सुकता तशीच कायम राहीली. उलट बुथ व्यवस्थापनाची तयारी चोख न झाल्यास पदाधिकारी पदांना मुकतील या त्यांच्या तंबीमूळे पदाधिकारी कृतीशील होतील. उमेदवारीचे गणित शेवटच्या मिनिटा पर्यंत हेलकावे खात असते. मात्र बुथवरचा कार्यकर्ता भक्कम आणि ठाम असला तर उमेदवार कोणत्याही लाटेवर तरुन जातो हे भारतीय जनता पक्षाचे सूत्र राष्ट्रवादी आचरणात आणताना दिसते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)