प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशनंतरही सांडपाणी प्रकल्प बंदच

महाबळेश्‍वर येथील प्रकार : मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची नगरसेवकाची मागणी

महाबळेश्‍वर – गेली अनेक वर्षे बंद असलेला सांडपाणी प्रकल्प तातडीने सुरू करण्याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने आदेश दिले असतानाही अद्यापही सांडपाणी प्रकल्प बंद अवस्थेतच आहे. या प्रकल्पाची पाहणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी बी. एम. कुकडे यांनी आज केली. दरम्यान पालिकेत कुकडे यांची भेट घेवून नगरसेवक संजय पिसाळ यांनी या प्रकरणी पालिकेच्या मुख्याधिकारी यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे 4 दशलक्ष व 1 दशलक्ष क्षमतेचे दोन प्रकल्प महाबळेश्‍वर पालिकेने उभारले आहेत. मात्र हे दोन्ही प्रकल्प गेली काही वर्षे बंद पडले आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने हे दोन्ही प्रकल्प सुरू करण्याबाबत वारंवार नोटीसाही बजावल्या होत्या. परंतु पालिकेने या नोटिसांना केराची टोपली दाखवत या प्रकल्पांकडे दुर्लक्षच केले आहे. हे प्रकल्प बंद असल्याने सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच ते थेट जंगलात सोडण्यात येत आहे. हा प्रकल्प बंद असल्याने या प्रकल्पा शेजारी असलेल्या दलित वसाहतीमध्ये प्रचंड दुर्गंधी पसरत असून नागरिकांना जगणे मुष्कील झाले आहे.

नागरिकांमधून वाढणाऱ्या तक्रारींमुळे नगरसेवक संजय पिसाळ यांनी पत्रकारांसमवेत या प्रकल्पाची पाहणी केली असता या प्रकल्पाच्या टाक्‍या पुर्ण क्षमतेने भरल्या असून मैलासहीत वाहत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकल्पाची पाहणी करीत असतानाच तेथे प्रदुषण नियंत्रण मंडळाचे वाहनचालक माने तेथे आले व त्यांनी उघड्यावर सोडण्यात आलेल्या सांडपाण्याची पाहणी केली व जंगलात सोडण्यात आलेल्या सांडपाण्याचे नमुणे घेतले. सांडपाणी प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर नगरसेवक पालिकेत गेले. तेथे मुख्याधिकारी यांच्या दालनात महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी बी. एम. कुकडे बसले होते. नगरसेवक यांनी कुकडे याना बंद असलेल्या सांडपाणी प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच पालिकेच्या कारभारास मुख्याधिकारी यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणीही संजय पिसाळ यांनी यावेळी केली.

पालिकेचा सांडपाणी प्रकल्प बंद आहे. यामध्ये कोणाचेही दुमत नाही. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीसा देवूनही पालिकेने हा प्रकल्प सुरू केला नाही, आजही हा प्रकल्प बंद आहे. याबाबत मी पुढील कारवाईसाठी माझा अहवाल वरिष्ठांकडे पाठविणार असून वरीष्ठांकडून जे निर्देश येतील त्याप्रमाणे पालिकेवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती बी. एम. कुकडे यांनी पत्राकारांशी बोलताना दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)