प्रदूषणाबाबत खरेच कोणी गंभीर आहे का?

– गायत्री वाजपेयी

पुणे – घनकचरा व्यवस्थापनाच्या अभावामुळे राज्यात बांधकामांसाठी न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिली आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या “स्टार रेटिंग प्रोग्रॅम’च्या पाहणीतून राज्यातील 30 टक्के कंपन्या या सर्वाधिक प्रदूषक कंपन्या असल्याचे समोर आले आहे.

राज्य सरकारने लागू केलेल्या प्लॅस्टिक बंदीनेदेखील अल्पावधीतच आपला जीव गमावला. शहराची हवा आणि पाणी किती शुद्ध आहेत हे तर उघड्या डोळयांनी अगदी सहजपणे आपल्याला दिसते. एकूणच निरोगी जीवन जगण्यासाठी अत्यावश्‍यक असलेल्या पर्यावरणीय घटकांना प्रदूषणाचा विळखा वाढत आहे. मात्र या प्रदूषणाकडे गांभीरतेने पाहण्याची तसदी ना शासन घेत आहे, न सर्वसामान्य नागरिक ही अतिशय दु:खद बाब आहे.

पर्यावरणविषयक काम करणाऱ्या विविध संस्थांकडून सातत्याने वाढत्या प्रदूषणविषयक धोक्‍याची सूचना दिली जात आहे. मात्र, त्याकडे राजरोसपणे दुर्लक्ष केले जाते. पर्यावरणविषयक हलगर्जीपणा किती भयंकर ठरू शकतो, याची प्रचिती नुकतीच केरळ येथील पूराच्या माध्यमातून आपण अनुभवली आहे. इतकेच नव्हे, तर दैनंदिन जीवनातदेखील आपल्याला विविध समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र “तहान लागेल तेव्हा विहीर खोदायची’ या वृत्तीमुळे सध्या या समस्येबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नाही. प्रदूषण रोखण्याचे काम सरकारचे आहे, असे म्हणत नागरिक आपली जबाबदारी झटकून मोकळे होतात. तर आमचे प्रयत्न चालू आहे, असे म्हणत प्रदूषणाच्या प्रश्‍नाबाबत चालढकल करण्याचे काम सरकारकडून केले जाते.

प्रदूषण नियंत्रणाच्या नावावर केवळ नोंदणी, बैठका, चर्चा आणि सूचना हीच काय ती कामे सरकारी यंत्रणा करत असतात. यात कौतुकास्पद बाब म्हणजे, आपल्याकडे किती प्रदूषण होत आहे याची अचूक आणि अद्ययावत आकडेवारी सरकारी यंत्रणांकडे असते. त्याबद्दल त्यांचे कौतुकच केले पाहिजे. मात्र प्रदूषण होत आहे, ते कोठे, कधी, कोणाकडून आणि कसे होत आहे हे माहित असूनही प्रदूषण करणाऱ्यांवर कडक कारवाई का केली जात नाही? या कारवाईसाठी एखादी मोठी दुर्घटना होण्याची वाट आपण पाहणार आहे का? इंग्रजीत असलेल्या “प्रिकाॅशन इज ऑलवेज बेटर दॅन क्‍युअर’ या म्हणीप्रमाणे आपण पर्यावरणीय “प्रिकाॅशन'(काळजी) घेणार आहोत, की एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर क्‍युअर(उपचार) करणार आहोत, याचे उत्तर कोण देणार? असा प्रश्‍न उपस्थित राहतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)