रामदास आठवले : शहरी गॅस वितरण योजनेचा शुभारंभ
सातारा दि. 22 (प्रतिनिधी)- वातावरणातील प्रदुषण कमी करण्यासाठी केंद्र शासन विविध उपाययोजना करीत आहे. याचाच एक भाग म्हणून वाहने आणि घरगुती वापरासाठी सीएनजी गॅस योजना लागू केली आहे. या गॅस मुळे प्रदुषण रोखण्यासाठी तर मदत होणार असून आर्थिक बचतही होणार आहे. या सीएनजी गॅसचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सभागृहात शहरी गॅस वितरण योजनेचा शुभारंभ आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. प्रारंभी पाईपलाईनद्वारे गॅस वितरणाचा मुख्य कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे झाला. त्याचे थेट प्रसारणही यावेळी दाखविण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी खा. उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, भारत पेट्रोलियमचे अरुण सिंग, शुभंकर सेन आदी यावेळी उपस्थित होते.
भारतात 6.2 टक्के तर जगात 23.4 टक्के लोक गॅस वापरतात. सीएनजी गॅस पाईपद्वारे उद्योगांना, घरगुती वापरासाठी तसेच वाहनांना उपलब्ध करुन देण्यात येणार असून हा गॅस स्वस्त असल्यामुळे मोठी आर्थिक बचत होणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश प्रदुषण रोखने हा आहे. प्रदुषण कमी झाले तर आपल्या निरोगी आणि जास्त जीवन जगता येईल. सीएनजी गॅस स्वस्त असून पर्यावरणातील प्रदूषण कमी करण्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील लोकांनी आता सीएनजी गॅस वापरण्याची सवय लावली पाहिजे. वाहनातील पेट्रोला सीएनजी हा एक पर्याय असून वाहनधारकांनी याचा उपयोग करुन घेतला पाहिजे, असे आवानही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी केले. पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे कधी पाऊस पडतो, कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळ अशी परिस्थिती निर्माण होत आहे. पर्यावणाची प्रदुषण रोखण्यासाठी केंद्र शासनाने सीएनजी गॅसच्या दिशेने पाऊल टाकले हे कौतुकास्पद आहे. प्रदुषण कमी करण्याची नवी चळवळ आता उभी राहिले पाहिजे. प्रदुषण कमी करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होवू नये यासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड केली पाहिजेत तसेच वृक्षांची तोड होऊ नये यासाठी दक्ष राहिले पाहिजे. सीएनजी गॅस योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन खा. उदयनराजे भोसले यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाच स्वागत व प्रास्ताविक भारत पेट्रोलियमचे अरुण सिंग यांनी केले. या कार्यक्रमास आमदार आनंदराव पाटील, विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा