प्रत्येक जिल्ह्याचा कृषी आराखडा होणार

पुणे,- कृषी विभागांच्या विविध योजनांसाठी असलेला निधी फेब्रुवारी महिन्यापर्यंत खर्च करावा तसेच या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करुन घेण्यासाठी विभागाच्या अधिकारी प्रयत्न करावेत.असे आदेश राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी आज येथे दिले.यावेळी त्यांनी प्रत्येक जिल्ह्यांचा स्वतंत्र असा पाच वर्षाचा कृषी आराखडा तयार करण्याच्या सूचनाही दिल्या.
कृषि विभागाच्या कामकाजाचा आढावा आयुक्त सिंह यांनी पुण्यात झालेल्या बैठकीत घेतला. या बैठकीत सूक्ष्म सिंचन, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना, उन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियान, कापसावरील शेंदरी बोंडअळी, जलयुक्त शिवार अभियान, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, मागेल त्याला शेततळे, एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम, जमीन आरोग्य पत्रिका वितरण कार्यक्रम, परंपरागत कृषी विकास योजना आदी विषयांचा आढावा घेण्यात आला.
‘प्रत्येक जिल्ह्याच्या कृषिविषयक कामांचा पुढील पाच वर्षांचा आराखडा तयार करावा; तसेच केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजना, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, राष्ट्रीय कृषि विकास योजना, उन्नत शेती-समृध्दी शेतकरी अभियान आदी योजनांचा निधी फेब्रुवारी महिन्यापर्यंत खर्च करावा.’ असे सिंह यांनी बैठकीत सांगितले.
‘ठिबक सिंचन, नियंत्रित शेती, कांदाचाळ, यांत्रिकीकरण, सामूहिक शेततळे या योजनांचे अनुदान उपलब्ध असून, त्याचा विनियोग करावा.’ असेही सिंह म्हणाले.
कृषी विद्यापीठे, केंद्र सरकारच्या संशोधन संस्था, कृषी विज्ञान केंद्र, कृषी संशोधन केंद्र, सेंटर फॉर एक्‍सलेंस यांनी केलेल्या संशोधनाचा उपयोग शेतकऱ्यांना होण्यासाठी नियोजन करण्याचे सिंह यांनी सुचविले. शेतकऱ्यांना संशोधनाची माहिती होण्यासाठी दापोली, औरंगाबाद, नागपूर, बारामती, तळेगाव येथील सेंटर फॉर एक्‍सिलेंस केंद्रांना भेटी देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
मुख्यमंत्री कृषी अन्नप्रक्रिया योजनेचे प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करावेत, मागेल त्याला शेततळेची कामे पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे सादरीकरण बैठकीत करण्यात आले. जिल्ह्यांतील पाच हजार गावांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. हवामान अनुकूल कृषी पद्धतीला प्रोत्साहन देणे, काढणी पश्‍चात व्यवस्थापन आणि कृषीमूल्य साखळीचे बळकटीकरण, संस्थात्मक विकास, माहिती व सेवांचे आदानप्रदान या प्रकल्पात होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)