प्रत्येक आगारात एसटी बांधणार विश्रामगृह

चालक-वाहकांसाठी सुविधा : परिवहन मंत्र्यांचाही “ग्रीन सिग्नल’

पुणे – दिवसभर प्रवास करुन थकलेल्या चालक आणि वाहकांना दिलासा देण्याचा आणि त्यांना आरामदायी सुविधा देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक आगारात त्यांच्यासाठी वातानुकूलित तसेच सुसज्ज अशी विश्रामगृहे बांधण्याचा संकल्प महामंडळाने सोडला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वाहक आणि चालकांनी दिवसभराचा प्रवास करुनही त्यांना मुक्कामाच्या ठिकाणी आरामासाठी पुरेसे विश्रामगृह नाहीत, त्याशिवाय त्यांना अन्य सुविधाही मिळत नाहीत. त्याबाबत कामगार संघटनांच्या वतीने आतापर्यंत महामंडळ आणि राज्य शासन यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता.

परंतु, त्यांना आश्‍वासनाच्या शिवाय हाती काहीच लागले नाही. त्यामुळे यासाठी पुढाकार घेण्याची विनंती एसटी कामगार सेनेच्या वतीने राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष दिवाकर रावते यांना करण्यात आली होती. त्यानुसार रावते यांनी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन अत्याधुनिक आणि वातानुकूलित विश्रामगृहे बांधण्याचा निर्णय घेतला असून ही योजना लवकरच प्रत्यक्षात अंमलात आणण्यात येणार आहे, अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी दिली.

यासंदर्भात एसटी कामगार सेनेचे स्वारगेट डेपो सचिव उल्हास बढे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, महामंडळाचा हा निर्णय निश्‍चितच स्वागतार्ह असाच आहे. या निर्णयामुळे हजारो वाहक आणि चालकांना दिलासा मिळणार आहे.

सामाजिक संस्थांची मदत घेणार
महामंडळाची सध्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता महामंडळाला हा खर्च परवडणारा नाही, ही बाब लक्षात घेऊन सामाजिक संस्थांना यासंदर्भात आवाहन करण्यात येणार आहे. त्या-त्या भागातील सामाजिक संस्थांनी अशा प्रकारे तयारी दाखविल्यास त्यांच्याच माध्यमातून हा खर्च करुन घेण्यात येणार आहे, त्यांची तयारी असल्यास त्या संस्थेचे अथवा ते सुचवतील त्या व्यक्तीचे नाव संबधित विश्रामगृहाला देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)