प्रत्यक्ष विमानतळासाठी किती जागा लागणार?

सल्लागार कंपनीकडून मागविली माहिती 

पुणे – पुरंदर तालुक्‍यातील विमानतळासाठी शासनाने 7 गावांमधील 2 हजार 832 हेक्‍टर जागा निश्‍चित केली आहे. मात्र, विमानतळ उभारणीसाठी प्रत्यक्षात किती जागा लागणार याबाबतची माहिती विमानतळासाठी नेमलेल्या सल्लागार कंपनीकडून मागविण्यात आली आहे. ही माहिती उपलब्ध झाल्यानंतर विमानतळासाठीची जागा निश्‍चित करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस (एमएडीसी) विशेष नियोजन समिती म्हणून शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. तसेच विमानतळासाठी हद्दनिश्‍चित केले असून त्याचे सर्व्हे नंबर जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे विमानतळाचे काम मार्गी लागण्याच्या दृष्टीने हे एक पाऊल पुढे पडण्याची मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून यापूर्वीच विमानतळाच्या तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्य अहवाल तयार करण्याचे काम जर्मन येथील “डार्स’ या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीकडून त्या संदर्भातील अहवाल सप्टेंबरमध्ये प्राप्त होणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे.

प्रत्यक्षात कोणत्या जागेवर विमानतळाची उभारणी होणार आहे. हे अजून निश्‍चित नाही. यासाठी 1800 ते 2200 हेक्‍टर पर्यंतची जागा लागणार आहे. 2,832 हेक्‍टर पैकी विमानतळासाठी नेमकी कोणती आणि किती जागा लागणार आहे, विमानतळ कुठे उभारणे सोयीचे आहे, यांचा सल्ला डार्स या कंपनीकडून घेण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)