प्रतिष्ठा राखण्यासाठी भारताला अखेरची संधी; कूकला विजयाने निरोप देण्यास इंग्लंड उत्सुक

लंडन: चौथ्या कसोटीसह पाच सामन्यांची कसोटी मालिका 1-3 अशा फरकाने गमावणाऱ्या भारतीय संघाला आज (शुक्रवार) सुरू होत असलेली निर्णायक पाचवी कसोटी जिंकून प्रतिष्ठा राखण्याची अखेरची संधी आहे. त्याच वेळी अखेरच्या सामन्यात विजय मिळवून सलामीवीर ऍलिस्टर कूकला विजयी निरोप देण्यास इंग्लंडचा संघ उत्सुक आहे. त्यामुळे या कसोटीत कमालीची चुरस रंगणार आहे.

आताचा भारतीय संघ आधीच्या संघांच्या तुलनेत परदेशात चांगली कामगिरी करीत असून माझा या संघावर संपूर्ण विश्‍वास असल्याचे भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटले आहे. गेल्या 15-20 वर्षात अन्य कोणत्याही भारतीय संघाने इतक्‍यात कमी कालावधीत अशी कामगिरी करून दाखवल्याचे मी पाहिलेले नाही. त्यावेळच्या संघात प्रतिभाशाली खेळाडू असूनही अशी कामगिरी करणे शक्‍य झाले नव्हते, असे सांगून शास्त्री म्हणाले की, सामना हरल्यानंतर दु:ख होते. पण यातून मार्ग काढायला शिकायला हवे.

स्वत:वर विश्वास ठेवला तर यश निश्‍चितच मिळेल असे सांगून शास्त्री म्हणाले की, परदेशात कसोटी मालिका जिंकण्यासाठी मानसिकदृष्टया कणखर होणे आवश्‍यक आहे. आम्ही विजयाच्या जवळ पोहोचलो, चांगली लढत दिली पण आता तेवढ्याने भागणार नसून इथून पुढे सामने जिंकावे लागतील. कुठे चुकलो त्याचा अभ्यास करून पुढे ती चूक सुधारली पाहिजे. भारताने राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये अखेरची कसोटी मालिका जिंकली होती. त्यानंतर सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी व अनिल कुंबळे यांनीही संघाचे नेतृत्व केले. मात्र त्यांना मालिका जिंकता आली नव्हती.

चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारतीय संघात बदल होण्याची शक्‍यता आहे. चालू मालिकेत सलामीवीर लोकेश राहुल सातत्याने अपयशी ठरत असल्याने त्याच्या जागी पृथ्वी शॉला अखेरच्या कसोटीसाठी भारतीय संघात जागा मिळण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. मात्र भारतीय संघव्यवस्थापनाने अंतिम 11 खेळाडूंची यादी अद्याप जाहीर केलेली नाही.

त्यातच चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्‍य रहाणेसोबत लोकेश राहुलही स्लिपमध्ये झेल घेण्याचा सराव करताना दिसला. त्यामुळे अखेरच्या कसोटीसाठी पृथ्वी शॉला संघात जागा मिळेल याची शक्‍यता आता मावळताना दिसते आहे. मात्र दुसरीकडे अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या जागी हनुमा विहारीला संधी देऊन फलंदाजीचा पर्याय आणखी बळकट केला जाण्याची शक्‍यता आहे. हनुमा विहारी सरावादरम्यान फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्यासोबत चर्चा करताना दिसून आला.

याचसोबत भारतीय संघातील एकमेव फिरकीपटू रविचंद्रन आश्विनलाही अंतिम कसोटीसाठी विश्रांती देऊन रवींद्र जडेजाचा संघात समावेश केला जाऊ शकतो. चौथ्या कसोटीत आश्विनला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नव्हती. विशेष करून फिरकी गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर मोईनच्या झगझगीत यशासमोर आश्विनचे अपयश डोळ्यात भरणारे ठरले. त्यातच अश्‍विन फलंदाजीतही सातत्याने अपयशी ठरत आहे. यामुळे अंतिम सामन्यासाठी जडेजाला संघात जागा दिली जाऊ शकते.

प्रतिस्पर्धी संघ –
भारत – विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), करुण नायर, हार्दिक पांड्या, रविचंद्रन अश्‍विन, रविंद्र जडेजा, हनुमा विहारी, ईशांत शर्मा, उमेश यादव, शार्दूल ठाकुर, मोहम्मद शमी व जसप्रीत बुमराह.
इंग्लंड – जो रूट (कर्णधार), ऍलिस्टर कूक, कीटन जेनिंग्ज, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, ऑलिव्हर पोप, मोईन अली, आदिल रशीद, सॅम करन, जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, ख्रिस वोक्‍स व बेन स्टोक्‍स.

सामन्याची वेळ- दुपारी 3-30 पासून.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)