प्रचाराबाबतचा निर्णय रिपाइं लवकर घेणार : वाकचौरे

अकोले – आरपीआयचे नेते रामदास आठवले यांना आघाडी व युतीने सतत सापत्न वागणूक दिली आहे. त्यामुळे नगर दक्षिण व शिर्डी मतदारसंघातील प्रचार मोहिमेबाबत चार एप्रिल रोजी निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आरपीआयचे (आठवले गट) राज्य सचिव विजयराव वाकचौरे यांनी दिली.

केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे बैठक होणार आहे. त्यासाठी नगर जिल्ह्यातील पाच हजार कार्यकर्ते यावेळी आठवले यांना भेटून आपल्या व्यथा मांडणार आहेत. विशेषतः शिर्डी मतदारसंघातील खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विषयी मतदारसंघात प्रचंड नाराजी आहे. लोखंडे यांनी समाजाचे कुठलेही प्रश्‍न, अथवा कुठलेही काम केलेले नाही किंवा कधीही रिपाइंच्या कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेतले नाही. त्यामुळे शिर्डी मतदारसंघात त्यांचे काम न करता स्वतंत्र उमेदवार देऊन (सामाजिक उमेदवारी) मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव मंत्री आठवले यांच्या पुढे मांडण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

ते म्हणाले, वास्तविक पाहता नगर जिल्हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे. या जिल्ह्यात आंबेडकरी चळवळीतील बी. सी. कांबळे 1957 साली खासदार झाले होते. मात्र त्यानंतर कुठल्याही कार्यकर्त्याला संधी मिळाली नाही. एवढेच नाही तर राखीव जागांवरील अर्थात जिल्हा परिषद अध्यक्षपद, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, नगराध्यक्षपद ते लोकसभा, विधानसभेपर्यंत देखील प्रस्थापित पक्षांनी “घरगड्याला उमेदवारी’ देऊन आंबेडकरी कार्यकर्त्यांचा कायमच अवमानच केला आहे. प्रस्तापित पक्षांनी जाणीवपूर्वक चळवळीत काम करणाऱ्या नेत्यांना उमेदवारी पासून दूर ठेवले. आंबेडकरी चळवळीचा नेत्यांचा उपयोग केवळ आपल्या फायद्यासाठी केला. राज्यात सेना- भाजप -रिपाइं युती आहे. मात्र होऊ घातलेल्या निवडणूक जागावाटपात रिपाइंला कुठेही विचारात घेतले नाही. वास्तविक आरक्षित शिर्डी मतदारसंघ किंवा दक्षिण मध्य मुंबई या जागेची मागणी रिपाइंने केली होती.

मात्र युतीने कुठलाही निर्णय घेतला नाही. त्यामुळे नगर दक्षिण व शिर्डी मतदारसंघात महायुतीचे काम करायचे की नाही, अशा संभ्रमात कार्यकर्ते आहेत.मंत्री आठवले यांच्यासाठी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाची मागणी रिपाइंने केली होती. मात्र या संदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही. दक्षिण मध्य मुंबईची जागा शिवसेनेकडे आहे. दोन्ही पक्षांनी तडजोड करत ही जागा रिपाइंला सोडायला हवी. असे न झाल्याने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचा हा एक प्रकारे अवमान असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. अशी सल त्यांनी व्यक्त केली. जागावाटप बाबत निर्णय न झाल्याने नगर दक्षिण व शिर्डीत युतीचे काम करायचे नाही ही भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. जिल्ह्यात इतर राष्ट्रीय पक्षांनी देखील बौद्ध उमेदवारांना जाणीवपूर्वक डावलले आहे, असेही ते शेवटी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)