प्रचाराची सांगता; उद्या मतदान

बारामती मतदारसंघासाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

जिल्हा प्रतिनिधी

पुणे- बारामती लोकसभा मतदारसंघाकरिता गेल्या 13 दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराची सांगता आज सायंकाळी पाच वाजता झाली. बारामती मतदासंघात 18 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. यापैकी प्रमुख राजकीय पक्षांत चुरूस असून राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील नेत्यांनी विराट सभा घेत मतदारांवर प्रभावी मारा करण्याचा प्रयत्न केला. या मतदारसंघाकरिता मंगळवारी (दि.23) मतदान होत असून दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघाकरिता अधिकृत उमेदवारी (दि.9) जाहीर झाल्यानंतर प्रचाराला वेग आला. यामध्ये प्रमुख राजकीय पक्षांत प्रचारादरम्यान मोठी चुरस दिसून आली. प्रामुख्याने बारामती मतदार संघात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससह महाआघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजप-शिवसेनेसह महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांचा प्रचार रंगला. सुप्रिया सुळे यांच्याकरिता खुद्द पक्षाध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार हेच मैदानात उतरले होते. त्यांनी बारामती आणि इंदापुरात विराट सभा घेतल्या. दौंडमध्ये कोपरा सभेसह, घोंगडी बैठका घेत पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह जनतेशीही संवाद साधला. यासह मनसेचे प्रमुख राज ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॉंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्याही सभा वादळी ठरल्या. तर, कांचन कुल यांच्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य जलसंपदामंत्री विजय शिवतारे, महादेव जानकर यांनी सभा घेत पक्षाचे धोरण मतदारांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्रवादी आणि भाजपने प्रचाराच्या सांगता सभा इंदापुरात घेतल्या. रात्री 10:30 पर्यंत बहुतांशी ठिकाणी कोपरा सभा सुरू होत्या. रविवार (दि.21) सुट्टीचा दिवस असल्याने इंदापुरात झालेल्या दोन्ही पक्षांच्या सांगता सभेस मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होती. आज, प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने उमेदवारांनी संपूर्ण मतदारसंघात शक्तिप्रदर्शनाद्वारे रॅली काढल्या. जाहीर सभा, पदयात्रा, कोपरा सभा, बैठका विविध समाजांचे मेळावे याबरोबरच सोशल मीडीयावरूनही प्रचार यंत्रणा उभारली होती. प्रचार गीते, एलईडी स्क्रीन, जीप, तीनचाकी सायकली आदींचा वापर प्रचाराकरिता करण्यात आला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)