प्रचाराचा पोत कोण सुधारणार? (अग्रलेख)

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणूक प्रचार सभांमध्ये बोलताना पंतप्रधानपदाची मर्यादा ओळखून वक्‍तव्ये करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी मोदींना प्रचार सभांमध्ये बोलताना संयमही बाळगण्याची सूचना केली आहे. सध्या सुरू असलेल्या निवडणूक प्रचार सभांमधील भाषणांचा स्तर पाहिला, तर ही निवडणूक आहे की पोरखेळ? असा प्रश्‍न पडावा अशी स्थिती आहे. कोणी राहुल गांधी यांना त्यांचे भारतीयत्व सिद्ध करण्याचे आव्हान देतो आहे, कोणी त्यांना ते जनेउधारी कसे हे सिद्ध करण्यास सांगतो आहे, तर कोणी त्यांचे गोत्र विचारतो आहे. तिकडे कॉंग्रेसचेही काही तोंडाळ नेते अशीच विचित्र भाषा प्रचार काळात वापरताना दिसतात.

डॉलर्सच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरली आहे. त्या अनुषंगाने मोदींवर टीका करताना कॉंग्रेसच्या प्रवक्‍त्याने विनाकारणच मोदींच्या मातोश्रींचा उल्लेख केला. डॉलरची किंमत सन्माननीय मोदींच्या आदरणीय माताजींच्या वयाशी स्पर्धा करीत आहे असे वक्‍तव्य कॉंग्रेस नेते राजबब्बर यांनी केले होते. विलास मुत्तमेवार यांनीही राहुल गांधींचे वडिलांना, आजोबांना आणि आजीला सारा देश ओळखतो. पण मोदींच्या वडिलांना कोण ओळखतो?े असे विधान केले होते. या थिल्लरपणाला खुद्द मोदींनीच जाहीर सभांमध्ये मोठी हवा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनीही आपल्या पदाची प्रतिष्ठा राखून विधाने करायला हवी होती. पण त्यांच्याकडून तसे होताना दिसत नाही. उलट राज बब्बर, विलास मुत्तेमवार यांची विधाने मीठमसाला लावून वापरली आणि त्यावरून लोकांची सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी केलेला दिसला.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या काळात मणिशंकर अय्यर यांनी मोदींना उद्देशून बोलण्याच्या ओघात नीच हा शब्द वापरला होता. त्याचे मोठे भांडवल मोदींनी गुजरात प्रचार काळात केले आणि मला नीच म्हटले गेले, यावरून त्यांनी टाहो फोडला. त्यांच्या तंत्राचा त्यांना काही प्रमाणात तेथे राजकीय लाभ झाला. त्यामुळे आता एखाद्‌दुसरा शब्द पकडून दुसऱ्या राजकीय पक्षाच्या विरोधात टाहो फोडण्याची फॅशनच पंतप्रधानांनी प्रचार सभांमध्ये रूढ केली असल्याचे सध्या दिसते आहे. वारंवार एखाद्या क्षुल्लक विषयाचा मोठा बाऊ करून पंतप्रधानांनी इतक्‍या खालच्या पातळीवर येऊन प्रचार करण्याला खूप आधीच पायबंद बसयला हवा होता. पण त्यांना हा पायबंद कोण घालणार हा प्रश्‍न होता. वयाची ज्येष्ठता आणि पदाच्या प्रतिष्ठेच्या आधारे मनमोहन सिंग यांनी मोदींना या प्रकरणात जागरूकता बाळगण्याचा सल्ला पुन्हा दिला असला, तरी ते कितपत मानतील हा प्रश्‍नच आहे. कर्नाटकातील एका सभेत तर पंतप्रधानांनी थेट धमकीचीच भाषा वापरली होती.

“मला मोदी म्हणतात. विनाकारण माझ्या नादी लागाल तर लेने के देने पड जाएंगे’ अशी धमकीवजा भाषा त्यांनी वापरली होती. त्यावेळी मनमोहन सिंग यांनी मोदींच्या विरोधात थेट राष्ट्रपतींकडेच तक्रार केली होती. सध्या पाच राज्यांत विधानसभांच्या निवडणुकांचा प्रचार सुरू आहे. तेथे स्टार कॅम्पेनर म्हणून विविध राजकीय पक्षांची नेतेमंडळी त्या राज्यांमध्ये जात आहेत. त्यांना स्थानिक विषयांची फार माहिती नसते म्हणूनच बहुधा ते असली हवाहवाई करताना दिसत असावेत. पण ही हवाहवाई करताना आपण किती खालच्या पातळीवर जायचे याचे भान राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी ठेवायला पाहिजे, अशी अपेक्षा करणे चूक आहे काय? निवडणूक प्रचाराचा पोत वरच्या दर्जाचा राखणे ही राष्ट्रीय नेत्यांची जबाबदारी नाही काय? पक्षाचा कार्यक्रम, सरकारची पाच वर्षांतील कामगिरी, निवडणूक जाहीरनाम्यातील विषय यावर काही भाष्य निवडणूक प्रचारांमध्ये होणे अपेक्षित असते. त्यावर कोठेही मोठी चर्चा होताना दिसत नाही. अर्थात, याला केवळ राजकारण्यांना जबाबदार धरता येणार नाही.

टीआरपीच्या मागे धावणारा मीडियाही याला मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे. असले क्षुल्लक विषय मीडिया लावून धरीत असतात. त्यांना सामाजिक भान आणि राष्ट्रीय जबाबदारी हे विषय समजावून सांगणे हे कोणाच्याही क्षमतेबाहेरचे आहे. राजकारणाचा पोत दर्जेदार ठेवायचा असेल तर या टीआरपी आधारित काम करणाऱ्या मीडियालाही आवर घातला गेला पाहिजे. राजकारणी वातावरण तापवत असतो, बऱ्याच वेळा ती त्याची राजकीय गरजही असते. पण आपण कशाला आणि किती प्रसिद्धी द्यायची याचे भान या मीडियानेही ठेवायला नको का? हाही महत्त्वाचा प्रश्‍न आहे. अलीकडच्या निवडणुकांमध्ये फुकटेगिरीलाही उत्तेजन मिळताना दिसत आहे.

अमुक इतक्‍या दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, हे फुकट देऊ, ते फुकट देऊ अशाही वल्गना सुरू होतात. त्यात लॅपटॉपपासून दुचाकी, टीव्ही अशा वस्तूंच्या फुकटेगिरीचेही आमिष असते. या प्रकाराला आता निवडणूक आयोगानेच लगाम घातला पाहिजे. निवडणुकीत दिली जाणारी आश्‍वासने निवडणूक आयोगाकडून तपासून घेऊन आणि त्यांची मान्यता घेऊनच दिली गेली पाहिजेत. त्याही आधी राजकारण्यांनी प्रचार काळातील भाषा सुधारण्यावरही कटाक्ष दिला पाहिजे. प्रचार काळात वापरली जाणारी भाषा स्वयंशिस्तीचा भाग म्हणून राजकारण्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनाही शिकवली पाहिजे. प्रचाराच्या काळातील थिल्लरपणामुळे राजकारण हा पोरखेळ ठरू पाहात आहे. राजकारणाचा असा पोरखेळ होऊ द्यायचा नसेल, तर प्रचाराचा पोत सुधारणे ही आजची तातडीची गरज आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)