प्रगत’ द्वारे महाराष्ट्राची नवी पिढी घडणार

पुणे – महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रातसुध्दा देशात अग्रेसर असावा यासाठी, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाद्वारे महाराष्ट्राची नवी पिढी घडणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानांतर्गत शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या शिक्षण परिषदेच्या चर्चासत्रात उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी मुख्य सचिव सुमित मलीक, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, ग्रामविकास व जलसंधारण सचिव असिमकुमार गुप्ता, सामाजिक न्याय विभागचे सचिव दिनेश वाघमारे, शिक्षण आयुक्त डॉ. बिपीनकुमार शर्मा उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, राज्यात सर्वाधिक तरतूद शिक्षण विभागासाठी करण्यात येते. शिक्षणावरील खर्च ही भविष्यातील गुंतवणूक आहे. मुल्याधिष्ठीत शिक्षण देऊन शिक्षीत पिढी निर्माण केल्यास गुतवणूकीतून परतावा मिळेल. माहितीचे रुपांतर ज्ञानामध्ये केल्यास विद्यार्थी खऱ्या अर्थाने शिक्षीत होतील. जेव्हा शिक्षीत पिढी तयार होईल, त्यावेळेस गुंतवणूकीचा परतावा मिळेल. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानांतर्गत शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांचे चांगले परिणाम समोर येत आहेत.

शिक्षक व विद्यार्थी टेक्‍नोसॅव्ही होत आहेत. जेथे शाळा प्रगत झाल्या आहेत तेथे, खाजगी शाळांकडून जिल्हा परिषद शाळेकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. बृहत शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत शिक्षण क्षेत्रात चांगली व्यवस्था निर्माण करायची आहे. लहान मुलांच्या मानसशास्त्रानुरुप शिक्षण दिल्यास ते लवकर शिकतात. विद्यार्थ्यांना मूल्यवर्धित शिक्षण दिल्यास, विद्यार्थी चांगला नागरिक बनण्यास मदत होते, असे ते म्हणाले.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी चर्चासत्राच्या आयोजनाचा हेतू सांगताना, राज्यातील आंतराष्ट्रीय शिक्षण देणारी पहिली शाळा मराठी भाषेची असेल असे सांगितले. तीन दिवसीय चालणाऱ्या या चर्चासत्रामध्ये महानगरपालिकांचे आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)