इंदोरी – येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे संचालित प्रगती विद्यामंदिर आणि ह.भ.प. आ. ना. काशिद (पा) ज्युनियर कॉलेजला “आयएसओ’ मानांकन प्राप्त झाले. “आयएसओ’ मानांकनासाठी शाळेचे परीक्षण लक्ष्मीकांत साधू यांनी केले.
प्रगती विद्या मंदिर शाळेची स्थापना 1965 साली झालेली असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उपक्रमशील सर्व सुविधांयुक्त शाळा म्हणून जिल्हा कृतीशील शाळा पुरस्कार प्राप्त झालेली ही शाळा आहे. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शाळा सुशोभिकरणासाठी अध्यापक वर्ग नेहमी कार्यरत होते. शाळेला आयएसओ मानांकन मिळावे यासाठी संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे आणि सचिव संतोष खांडगे यांच्या मार्गदर्शनाने एप्रिल 2018 पासून शाळेतील सर्व अध्यापकांनी सर्व प्रकारे प्रयत्न केले.
या परिश्रमातून शाळेत अनेक अत्याधुनिक सुविधा निर्माण केल्या. स्पर्धा परीक्षा, तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शनांचे आयोजन केले. आधुनिक संगणक कक्ष, ई-लर्निंग हॉल, सभागृह, बास्केट बॉल मैदान, प्रयोगशाळा, बोलक्या भिंती, सूचना फलक या सर्व गोष्टींमुळे शाळेस आयएसओ मानंकन प्राप्त झाले. ग्रामीण भागातील एकमेव “आयएसओ’ मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा झाल्याने तालुक्यातील सर्व स्तरांतून शाळेचे कौतुक होत आहे.
संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे, उपाध्यक्ष आमदार बाळा भेगडे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार सुरेश शहा आणि शालेय समिती अध्यक्ष दामोदर शिंदे यांनी शाळेचे प्राचार्य दशरथ ढमढेरे आणि पर्यवेक्षक बलभीम भालेराव यांच्यासह सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. या वेळी माजी सभापती विठ्ठल शिंदे, बबन भसे, बबन ढोरे, अरविंद शेवकर, दिनेश चव्हाण, संदीप काशिद, दिलीप ढोरे, प्रशांत भागवत, नितीन ढोरे, विक्रम पवार उपस्थित होते. सूत्रसंचालन लक्ष्मण मखर यांनी केले. पांडुरंग कापरे यांनी आभार मानले.