प्रक्रिया केलेल्या पाण्याचा ताळमेळच लागेना!

निष्क्रियतेचा मैला-भाग तीन

पुणे – महापालिकेच्या 10 शुद्धीकरण केंद्रांतून तथाकथित शुद्धीकरण केलेले पाणी मुंढवा जॅकवेलमध्ये उचलण्यात येते. तेथून ते बेबी कालव्यात पाठवले जाते. परंतु, प्रत्यक्षात या जॅकवेलमध्ये उचलले जाणारे पाणी, कालव्यात सोडले जाणारे पाणी आणि पुन्हा पाटबंधारेने उचललेले पाणी याचा कुठेच ताळमेळ लागत नाही, ही वस्तुस्थिती आहे. महापालिकेने दिलेल्या आकडेवारीतूनच ही गोष्ट स्पष्ट होते.

शुद्धीकरण केलेले पाणी पुढे देण्यासाठी खास हे मुंढवा जॅकवेल दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आले. त्याला महापालिकेने तब्बल 198 कोटी रुपये खर्च केले. त्यातील 100 कोटी जॅकवेलच्या यंत्रसामग्री आणि 98 कोटी रुपये पाइपलाइनसाठी खर्च केले. ती कार्यान्वितही झाली. रोज 1,350 एमएलडी पाणी महापालिकेल्या देण्याच्या बदल्यात मैलापाणी शुद्धीकरणातून शुद्ध होऊन शेतीच्या पुनर्वापरासाठी बेबी कालव्यात रोज 550 एमएलडी सोडण्याचा करार यावेळी करण्यात आला.

पिण्यासाठी लागणारे पाणी हे साहजिकच शेतीपेक्षा जास्त आहे. वर्षाला शेतीसाठी सुमारे साडेसहा टीएमसी पाणी वर्षभरातून पाठवले जाते. त्यामुळेच वर्षाला साडेसहा टीएमसी पाणी बेबी कालव्यात सोडण्याची सोय या जॅकवेलमधून करण्यात आली. परंतु, यातून वर्षाला साडेसहा टीएमसी पाणी उचलण्याऐवजी पाटबंधारे विभाग तीन-सव्वातीन टीएमसी पाणीही उचलत नाही. वर्षाला जेवढे पाणी उचलायला हवे तेवढे दोन वर्षांत उचलले गेल्याची आकडेवारीही माहिती अधिकारातून मिळाली आहे. वास्तविक दोन वर्षांची आकडेवारी ही साडेतेरा टीएमसी असणे अपेक्षित होते.

जर बेबी कालव्यातून मैलापाणी शुद्धीकरण केंद्रातून प्रक्रिया झालेले पाणी उपलब्ध असताना धरणसाठ्यातील पाणी का दिले जाते, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

कालवाफुटीचे खापर पाटबंधारे खात्याने महापालिकेने दिलेल्या सोयीसुविधांवर फोडले. एवढेच नव्हे, तर शहरातून वाहणाऱ्या कालव्याची दुरुस्ती ही महापालिकेने करायची, असा नियमही स्वत:हून केला. मात्र बेबी कॅनॉलपासून पुढे या कालव्यातील पाणी इंदापूरपर्यंत पोचणे आवश्‍यक होते. मात्र दौंड येथेच हा कालवा मागच्यावर्षी फुटल्याने आता त्याचे खापर कोणावर फोडणार, हा प्रश्‍न विचारला जात आहे. सद्यस्थितीत बेबी कालवा हा यवतपासून पुढे कार्यान्वितच नसल्याचे एका पाहणीत आढळून आले आहे. यवतपासून पाच किमी अंतरावर असलेल्या खुबगाव येथे हा कालवा बुजल्याचे दिसून आले आहे.

यामुळे महापालिकेने “जायका’च्या माध्यमातून हजारो कोटी रुपये खर्चून कितीही पाणी शुद्ध करून नदीत सोडले, तरी जेथे हे पाणी पोहोचवायचे आहे तो मार्गच बंद आहे. त्यामुळे शेतीच्या पाण्याचा, शहराच्या तहानेचा आणि औद्योगिक सेक्‍टरचा प्रश्‍न सुटणार आहे का?


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)