प्रकाश मेहतांची लोकायुक्तांमार्फत होणार चौकशी

मुख्यमंत्र्याची विधानसभेत घोषणा ः मोपलवारांच्या चौकशीसाठी एसआयटी

मुंबई – विरोधकाच्या रेट्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखेर आपल्या सरकारमधील मंत्र्याच्या घोटाळ्याच्या चौकशीची कोण करणार याची घोषणा करावी लागली. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या एसआरए घोटाळ्याची लोकायुक्तांमार्फत, तर एमआयडीसीचे गैरअधिसूचित केलेल्या भूखंडप्रकरणी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची स्वतंत्रपणे चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली. त्याचबरोबर समृद्धी जमिनीच्या भ्रष्टाचाराप्रकरणी ज्येष्ठ सनदी अधिकारी राधेशाम मोपलवार यांची ज्येष्ठ सनदी अधिकारी व आर्थिक गुन्हे शाखेचा अधिकारी यांची संयुक्त एसआयटी नेमून चौकशी करण्यात येणार आहे.

विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. प्रकाश मेहता यांच्यावर एसआरएचा केलेला आरोप हा कॉग्रेसच्या कार्यकाळातील आहे. या प्रकरणी 2009 सालीच गरज नसतानाही एफएसआय का वाढवून दिला याचीही चौकशी करावी लागेल असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच एमआयडीसीची गैरअधिसूचित झालेल्या 16 हजार 909 हेक्‍टर जमिनीपैकी 9 हजार 335 हेक्‍टर जमिन ही मागील सरकारच्या कार्यकाळातच गैरअधिसूचित झाली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

एकनाथ खडसेंना जो न्याय लावला तोच न्याय प्रकाश मेहता व सुभाष देसाई यांनाही लावा अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील व जयंत पाटील यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तेव्हा सुभाष देसाई यांच्या संदर्भात लोकायुक्तांशी चर्चा करेन. त्यांनी होकार दिला तर त्यांच्याकडून चौकशी करू असे सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी पेैटाळून लावली. या सर्व प्रकरणांची पूर्ण माहिती आधीच दिली आहे. केवळ कोणत्याही शंकेला वाव नको म्हणून चौकशी घोषित करण्यात आली आहे. विरोधी पक्षाने आरोप करायचे आणि मंत्र्याने राजीनामा दयायचा तर सर्व मंत्रीमंडळालाच घरी बसावे लागेल असे मुख्यमंत्री म्हणाले.

एकनाथ खडसेंना दिलासा

एमआयडीसीची जर हजारो एकर जमिन गैरअधिसूचित करण्यास इतक्‍या मोठया मनाने मुख्यमंत्री तयार झाले, तर माझ्या भोसरी जमिन प्रकरणात तर 3 एकर जमिनीचाच प्रश्न आहे.पुन्हा तो व्यवहार मी स्वतः देखील केलेला नाही.मग ती देखील गैरअधिसूचित करून मला देखील मुख्यमंत्री न्याय देतील काय असा सवाल खडसे यांनी केला.तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस यांनी खडसेंची मागणी निश्‍चित तपासून पाहण्यात येईल व कायदेशीर निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट केले. तसेच खडसे अग्निदिव्यातून पूर्णपणे बाहेर येतील असे सांगत मुख्यमंत्र्यानी त्यांना दिलासा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)