पौडला मुळा नदीकडे जाणारा रस्ता चिखलात

पिरंगुट – पौड (ता. मुळशी) येथील मुळा नदीकडे तसेच स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची पावसामुळे वाट लागली असून सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे यावरून सध्या चालणेही कठीण झालेले आहे.
पौड येथे पुणे-कोलाड महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयापासून मुळा नदीकडे जाण्यासाठी साधारण दोनशे ते अडीचशे मीटरचा अरुंद रस्ता आहे. नदीकडेला काही शेतकऱ्यांची शेती तर महिला वर्ग धुणे धुण्यासाठी या रस्त्यावरून जात असतात. तसेच मुळा नदी काठावर स्मशानभूमीही आहे. मात्र या ठिकाणच्या रस्त्याचे डांबरीकरण कधीही करण्यात आले नाही. दरवर्षी सतत या ठिकाणी रस्ता खराब झाला की मुरूम आणून टाकण्याचे काम गेली अनेक वर्षे ग्रामपंचायतीने केले आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर आणि या रस्त्यावरून वाहनाची ये – जा झाल्यानंतर हा रस्ता चिखलमय होऊन चिकट होतो. त्यामुळे येथून चालणेही कठीण होत असते. पावसाळ्यात जर पौडगावात निधन झाले तर अंत्ययात्रा या रस्त्याने नदीपर्यंत नेण्यासाठी नातेवाइकांना तसेच ग्रामस्थांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. चालू ऑगस्ट महिन्यात पौड येथील काही ग्रामस्थांचे निधन झाले. या अंत्ययात्रेवेळी उपस्थित असलेले ग्रामस्थ, नातेवाईक आणि तालुक्‍यातील राजकीय नेते यांना या रस्त्याचा चालताना चांगलाच अनुभव आला आहे. त्यामुळे येथील रस्त्यावर लवकरच निधी पडून या रस्त्याचे डांबरीकरण होईल अशी अपेक्षा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)