पोहायला गेलेला विद्यार्थी इंद्रायणीत बुडाला

कामशेत – शाळेला जातो सांगून इंद्रायणी नदीपात्रात पोहायला गेलेल्या तीन विद्यार्थ्यांपैकी एक जण बुडाला. कामशेत (ता. मावळ) गावठाण स्मशानभूमीजवळ शनिवारी (दि. 30) सकाळी साडेदहा वाजता ही घटना घडली. शिवदुर्ग व आयएनएस शिवाजी लोणावळा रात्री उशिरापर्यंत विद्यार्थाचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही.

प्रथमेश दीपक साळुंखे (वय 14, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ, मूळगाव जळगाव जिल्हा) असे बुडालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश साळुखे व त्याचे दोन मित्र तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषदेच्या संत ज्ञानेश्‍वर विद्यालयात आठवी वर्गात शिकत आहेत. त्यांनी घरी शाळेत जातो सांगून कामशेत गावठाण स्मशानभूमीजवळ इंद्रायणी नदी पात्रात पोहायला आले. तिघे पोहण्यासाठी पाण्यात उतरले असता त्यातील प्रथमेश साळुंखे हा पाण्यात बुडाला. त्याचे मित्र दोघे जण बाहेर आले.

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी शिवदुर्ग व आयएनएस शिवाजी लोणावळा पथक दाखल झाले. त्यांनी पाणबुडीच्या सहाय्याने बुडालेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेतला. पण मावळात सुरु असलेल्या पावसामुळे इंद्रायणी दुथडी वाहत असल्याने अडथळा येत आहे. रात्री उशिरापर्यंत शोध कार्य सुरू होते. बुडालेला विद्यार्थी अद्यापही सापडला नाही.

प्रथमेश हा मुळचा जळगाव जिल्ह्यातील असून, तळेगाव दाभाडे येथे मावशीकडे राहत होता. त्यांची आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने तो सकाळी वृत्तपत्र टाकण्याचे काम करत होता. शाळेत न जाता पोहायला गेला आणि पाण्यात बुडाला. पोलीस हवालदार समीर शेख तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)