‘पोस्टर बॉइज’ मोकाटच!

कारवाईची गरज; अन्यथा भडकेल “फ्लेक्‍स वॉर’

– संजय कडू

पुणे – सिंहगड पोलीस ठाणे हद्दीत पोस्टर लावण्याच्या वादातून नुकताच एका तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. यापूर्वीही शहरात अनेक ठिकाणी पोस्टर लावण्यावरुन छोटे-मोठे वाद झाले होते. खुनाच्या प्रयत्नाच्या दोन-तीन घटनाही घडल्या. यानंतरही हे प्रकार गांभीर्याने घेतले गेले नाहीत. महापालिकेच्या आकाशचिन्ह विभाग आणि पोलीस खात्यानेही याप्रकारांची दखल घेतली नाही. मात्र आता फ्लेक्‍सच्या वादातून खून झाल्यानंतर तरी प्रशासनाने जागे होण्याची गरज आहे. अन्यथा, शहरात “फ्लेक्‍स वॉर’ भडकून खुनाच्या घटना वाढतील.

बेकायदा फ्लेक्‍सला अभय कोणाचे?
शहरातील प्रत्येक महत्वाचा चौक इतकेच नव्हे तर गल्ली बोळातील रस्तेही फ्लेक्‍सने भरलेले दिसतात. कारवाईवेळी इतर जाहिरातींचे फ्लेक्‍स टराटारा फाडताना दिसतात. मात्र, राजकीय नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाचे, विविध ग्रुपच्या फ्लेक्‍सला हात लावण्याचे धाडस करत नाहीत. याचे कारण म्हणजे, फ्लेक्‍स लावणाऱ्यांना स्थानिक राजकीय नेते व गुंडाचे अभय हे आहे.त्यांच्या कार्यकर्त्यांच्या फ्लेक्‍सवर कारवाई केली, तर संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांना थेट शिवीगाळ किंवा धमकावले जाते. यामुळे दुसऱ्या कार्यकर्त्याचा वाढदिवस येईपर्यंत पहिला फ्लेक्‍स हटत नाही.

कोण असतात हे पोस्टर बॉईज?
गल्ली बोळात चकाट्या पिटण्यासाठी जमणारे आता स्वत:चा एखादा ग्रुप तयार करत आहेत. या ग्रुपलाही तितकीच विचित्र नावे असतात. “यमराज ग्रुप’, “…गल्ली बॉईज ग्रुप’ अशा विविध नावाने हे ग्रुप स्थापन केले जातात. गल्लीत आपले वर्चस्व राहवे, आपली छबी प्रत्येकापर्यंत पोहचावी, यासाठी ते फ्लेक्‍सचा वापर करतात. यासाठी ग्रुपमधील सदस्याचा वाढदिवस हे एकमेक कारण त्यांना पुरेसे ठरते. यातील काही ग्रुप स्थानिक राजकीय नेत्याशी संबंधित असले, तर फ्लेक्‍सचा खर्चही संबंधित नेते देतात. फक्त अट एकच असते, की नेत्याचीही छबी त्यावर झळकवायची. एखाद्या परिसरामध्ये अनेक ग्रुप असतील, तर फ्लेक झळकवण्याची स्पर्धाच त्यांच्यामध्ये लागलेली असते. यामध्ये किशोरवयीन मुलांच्या ग्रुपचीही संख्याही दखल घेण्याजोगी आहे. सध्या फ्लेक्‍सच्या साईजची स्पर्धाच शहरात सुरू आहे. मोठ्यात मोठा फ्लेक्‍स लावण्यासाठी अनेक ग्रुप धडपडत आहेत. अनेक फ्लेक्‍सची साइज दोन ते चार मजली इमारती इतकी असते. यासाठी खास मोठे प्रिंटरही प्रिंटींग व्यावसायिकांकडे उपलब्ध झाली आहेत.

धडक कारवाईची गरज
दही हंडीपाठोपाठ अनेक सण-महोत्सव सुरू होत आहेत. या संधीचा वापर राजकीय नेते, गुंड आणि वेगवेगळे ग्रुप फ्लेक्‍सवर झळकण्यासाठी करतात. शहरातील महत्त्वाच्या चौकांत रातोतरात मोठाले फ्लेक्‍स लावले जातात. यामुळे काही व्यावसायिकांची दुकानेही झाकली जातात. मात्र, तक्रार करण्यास ते धजावत नाहीत. फ्लेक्‍समुळे सिग्नल यंत्रणाही झाकली जात असल्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे सण-महोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर फ्लेक्‍सला आळा घालणे आवश्‍यक आहे. अन्यथा त्यातून कायदा -सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो.

न्यायालयाचे निर्देश, पण…
न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, “बेकायदा फ्लेक्‍सवर महापालिकेने कारवाई करुन थेट फौजदारी गुन्हे दाखल करावेत. हे गुन्हे दाखल केल्यावर पोलिसांनी तत्काळ त्याची दखल घेऊन पुढील कार्यवाही करावी.’ मात्र, सध्या असे होताना दिसत नाही. महापालिकेचे अधिकारी फौजदारी दाखल करायला गेल्यावर त्यांना तीन ते चार दिवस चकरा मारायला लावल्या जातात.

‘वाढदिवसाच्या शुभेच्छा’ इतके कारणही पुरेसे…

निवडणुकीच्या काळात चौकाचौकांत राजकीय नेते स्वत:ची छबी फ्लेक्‍सवर झळकवतात. तसेच सणासुदीलाही शुभेच्छा देण्यासाठीही ते आपली छबी फ्लेक्‍सवर झळकवतात. मात्र, मागील काही वर्षांत ही परिस्थिती पूर्णत: बदलली आहे. आता गल्ली-बोळातील किशोरवयीन मुलांच्या छबीदेखील फ्लेक्‍सवर झळकत आहेत. यासाठी “वाढदिवसाच्या शुभेच्छा’ इतके कारणही त्यांना पुरेसे ठरते. इतकेच नव्हे तर बॅनरची साइज मोठ्यांत-मोठी ठेवण्याची एक स्पर्धाच सुरू झाली आहे. यातच दोन वेगवेगळ्या ग्रुपमधील व्यक्तींचा वाढदिवस एकाच दिवशी आला, तर फ्लेक्‍स लावण्यावरुन वादावादी ठरलेलीच असते. एकमेकांचे फ्लेक्‍स फाडणे, काळे फासणे, लाठ्या-काठ्या घेऊन हल्ला करणे आणि संधी मिळेल, तेव्हा बदला घेणे, असे प्रकार वाढले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)