“पोषण आहार’ खरच पौष्टीक राहिला का?

मुलांनीही आहाराकडे पाठ फिरवल्याचे पालक, अंगणवाडी सेविका, मदतनीसांची प्रतिक्रिया

पुणे – जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये प्राथमिकपूर्व शिक्षण घेणाऱ्या बालकांना राज्य शासनाकडून मिळणाऱ्या “पोषण आहारा’त बदल व्हावा, अशी मागणी पालक आणि अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्याकडून होत आहे. त्याबाबत जिल्हा परिषदेनेही शासनाला आहार बदलाबाबत लेखी निवेदन दिले आहे. त्यानुसार बालकांना पौष्टीक आहार मिळाला तर बालके सुदृढ होतील. तसेच, कुपोषीत बालके सुधारण्यास मदत होईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्य शासनाच्या वतीने सर्व शाळांमध्ये पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांना पोषण आहार दिला जातो. त्यामध्ये सुकडी, शेवई भात, डाळ खिचडी, लापशी हे आहार दिले जातात. मात्र, वर्षोनुवर्षे दिला जाणारा “पोषण आहार’ खरच पौष्टीक राहिला आहे का?, त्यातून मुलांना जीवनसत्वे मिळतात का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे मुलांनीही या आहाराकडे पाठ फिरवल्याचे पहायला मिळते. काही ठिकाणी पोषण आहार बनवण्याच्या पध्दती वेगळ्या असतात, त्यामुळे त्या आहाराला चव नसल्यामुळे आहार तसाच राहतो. त्यामुळे अन्नाची नासडी होत आहे. जिल्ह्यात याचे सर्वेक्षण केले आणि अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्याकडे विचारणा केली असता, सुरुवातीला ज्या प्रमाणे मुले आवडीने आहार घ्यायची त्याप्रमाणे आता घेत नाहीत. त्यामुळे आहाराची नासाडी होते. मुलांच्या आवडीनुसार आणि पौष्टीक आहार मिळाला तर ते नक्कीच खातील, असे शिक्षकांकडून प्रतिक्रिया आल्या.

दरम्यान, जिल्हा परिषदेने नुकत्याच 4 हजार 605 अंगणवाड्यांमधील बालकांची आरोग्य तपासणी केली. त्यामध्ये वय, वजन, आणि उंची याबरोबर आहाराची माहिती घेण्यात आली. या तपासणीनंतर 343 बालके ही अतिकुपोषीत तर 1 हजार 523 बालके कुपोषीत आढळून आली. कुपोषित बालकांमध्ये परप्रांतीय आणि स्थलांतरीत मजुरांच्या मुलांची संख्या सर्वाधिक असल्याचे समोर आले. मुले कुपोषीत होवू नये, त्यांना पोषक आहार मिळावा यासाठी राज्य शासन सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी हंगामी साखरशाळा सुरू करण्यात आल्या. तरीही कुपोषणाची संख्या कमी झाली नाही. दरम्यान, राज्य शासनाकडून जिल्ह्यातील तीव्र कुपोषीत मुलांवर विशेष लक्ष केंद्रीत करून त्यांना सुदृढ बनवण्यासाठी एक उपक्रम हाती घेतला आहे. मात्र, बालकांना अंगणवाडीतच पौष्टीक आहार मिळाला तर शासनाला वेगळे उपक्रम घ्यावे लागणार नाही. त्यामुळे सध्याच्या पोषण आहारामध्येही बदल होणे अपेक्षीत आहे.

मुलांना पौष्टीक आहार मिळणे गरजेचे आहे. त्यांना कोणत्या पदार्थांमधून पौष्टीक आहार मिळेल याचा विचार करून आहार दिला पाहिजे. त्यामुळे मुले आवडीने आहार घेतील आणि कुपोषणाची संख्याही कमी होईल. याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.
– विश्‍वासराव देवकाते, अध्यक्ष, जिल्हा परिषद

राज्य शासनाकडून जिल्ह्यातील मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात बदल करावा, अशी मागणी शासनाकडे केली आहे. त्याबाबतचा लेखी प्रस्तावही पाठवण्यात आला आहे. मुलांना पौष्टीक आणि वेगवेगळा आहार मिळाल्यास नक्कीच त्याचा फायदा होईल.
– राणी शेळके, सभापती, महिला व बालकल्याण समिती, जिल्हा परिषद


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)