पोवई नाक्‍यावरील रस्ते खोदल्याने गल्लीबोळांमध्ये वाहनांची दाटी

सातारा – पोवई नाक्‍यावर ग्रेड सेप्रेटरच्या कामामुळे मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद झाल्यामुळे या परिसरातील गल्लीबोळांमध्ये वाहनांची दाटी वाढू लागली आहे. साताऱ्याच्या पोवई नाक्‍यावर ग्रेड सेप्रेटरचे काम सध्या वेगात आहे. सायली हॉटेल ते रयत शिक्षण संस्थेपर्यंत खोदकाम केल्यामुळे डावी बाजू बंद झाली आहे तर रयत संस्थेकडील अत्यंत अरुंद मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू आहे. यामुळे याठिकाणी येणारे वाहने वाहतूक शाखेमार्गे खालचा रस्ता, लोणार गल्ली या मार्गांकडे जात आहेत.

खालच्या रस्ता मार्गावरून पोवई नाक्‍यावरील वाहतूक एकेरी वाहतूक पुन्हा सुरू केली आहे. यामुळे प्राथमिक शिक्षक बॅंकेसमोरून तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण काहीसा कमी झाला आहे. परंतु, बसस्थानकाकडून पोवई नाक्‍याकडे जाणारा मार्ग पूर्णत: बंद झाला आहे. त्यामुळे पोवई नाक्‍यासमोरून मच्छी मार्केटमार्गे याबाजूला जाणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढली आहे. तसेच राधिकारोड, मुख्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहने वाढली आहेत.

-Ads-

पोवई नाक्‍याचा उत्तर भागात खोदकामामुळे रस्ता अत्यंत चिंचोळा झाला असल्याने वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे अजिंक्‍य कॉलनी, जिल्हा शासकीय रुग्णालय, सैनिक बॅंक या तिन्ही ठिकाणावरून पोवई नाक्‍याकडे येणारे रस्ते जवळपास बंद झाले आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून आलेल्या वाहनानांना मधल्या छोट्याच्या बोळांमधून मार्ग काढत विशाल मेगा मार्टमार्गे पुन्हा पोवई नाक्‍यावर यावे लागत आहे. मुख्य रस्त्यावर येण्यासाठी मधल्या गल्लीबोळांचा वापर करावा लागत असल्यामुळे एरवी निरव शांतता असलेल्या ही ठिकाणे भर दुपारी वाहनांनी गजबजू लागली आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)