पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांनी रोखला बाल विवाह

नीरा पोलिसांनी केले पालकांचे समुपदेशन
नीरा  -नीरा (ता. पुरंदर) येथील एका अल्पवयीन मुलीचा होणारा विवाह नीरा पोलीस दूरक्षेत्राच्या पोलिसांनी रोखला. या मुलीचे लग्न तर थांबविलेच परंतु पालकांचेही पोलिसांनी समुपदेशन केले. यामुळे एका अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात यश आले आहे.
नीरा येथील गोपाळ समाजाची मोठी वस्ती आहे. अनेक अंधश्रध्दांसह हा समाज जगत असून शिक्षण व इतर सुविधांपासून वंचित आहे. यामुळे समाजात अजूनही बालविवाहाची प्रथा रूढ आहे. वाल्हे येथे काही महिन्यांपूर्वी याच समाजातील बालविवाह रोखले गेले. परंतु नीरेमध्ये प्रथमच पोलिसांच्या सजगतेमुळे ते रोखता आला. आज दोनच्या वाजता या वस्तीवरील एका मुलीच्या लग्नासाठी कालपासूनच जोरदार तयारी सुरू होती. लग्नाच्या दृष्टीने सगळी तयारी झाल्याची माहिती परिसरात कळाली. परंतु कुणीही विरोध केला नव्हता. एका सामाजिक कार्यकर्त्याकडून या लग्नाची बाब पोलीस फौजदार राजेश माळेगावे यांना समजली. माळेगावे यांनी तातडीने पावले उचलत हे लग्न रोखण्याचे आदेश दिले. सहायक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब बनकर, संदीप कारंडे, पोलीस पाटील राजेंद्र भास्कर आदी पोलीस पथक गेले आणि लग्न थांबविण्यास सांगितले. मुलीच्या पालकांना व नातेवाईकांना पोलीस ठाण्यात घेऊन आल्यानंतर माळेगावे यांनी पालकांना समज दिली. लग्नानंतर होणारे तोटे समजावून सांगितले.
याउलट समाजातील मुलामुलींना पुरेसे शिक्षण द्या, त्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊ. समाजातील अडचणींसाठीही प्रशासनासोबत पाठपुरावा करू, असे त्यांनी समाजातील प्रमुखांना सांगितले. शिवाय लग्नाचा विधी केल्यास कडक कारवाई करावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिली. ही खबर समजताच जमा झालेल्या नातेवाईकांना वाल्हे येथील गोपाळ समाजात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड, शाळाबाह्य मुलांसाठी काम करणारे अनिल चाचर यांनीही येथे येऊन पालकांच्या प्रबोधनाचा प्रयत्न केला. या प्रयत्नांमुळे एका मुलीचा बालविवाह रोखला गेला. शिवाय लग्नासाठी नातेपुते येथून निघालेले वऱ्हाडही निम्म्या रस्त्यातून माघारी गेले. राजेश माळेगावे यांच्या तत्परतेमुळे नीरा गावात प्रथमच बालविवाह रोखला गेला. सामाजिक क्षेत्रातून माळेगावे यांचे अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)