पोलीस बंदोबस्तात होणार भामा-आसखेडचे काम

शेतकऱ्यांची जमिनीच्या बदल्यात जमिनीची मागणी : प्रश्‍न अधिकच बनला जटील

पुणे – भामा-आसखेड पाणी योजनेचा तिढा काही सुटण्यास तयार नाही. जमिनीच्या बदल्यात जमीन मिळाली पाहिजे, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केल्यामुळे हा प्रश्‍न अधिकच जटील बनला आहे. आता महापालिका प्रशासनाकडून पोलीस बंदोस्तात प्रकल्पाचे काम करण्याचा निर्णय घेतला असून, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडून बंदोबस्त मागवण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून भामा-आसखेड प्रकल्पाचे काम बंद करण्यात आले आहे. पावसामुळे काम बंद ठेवण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती होती. प्रत्यक्षात प्रकल्पग्रस्त काम बंद केल्याचे समोर आले आहे. 2014 साली सुरू झालेला हा प्रकल्प अद्याप पूर्ण झाला नाही. जुलै 2018 ही प्रकल्पासाठी अंतिम मुदत आहे.

जिल्हाधिकारी नवलकुमार राम यांनी भामा-आसाखेड प्रकल्पाविषयी बैठक बोलावली होती. प्रकल्पबाधितांना जमिनीच्या बदल्यात जमीन देण्याची मागणी खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी केली आहे. खेड तालुक्‍यामध्येच प्रकल्पबाधितांना जमीन हवी आहे. एकूण 1 हजार 800 प्रकल्पबाधित असून, सुमारे दोन हजार 500 हेक्‍टर जमीन पुनर्वसनासाठी लागणार आहे. येथील नागरिकांना रोख मोबदला नको आहे. त्यामुळे ते काम करू देत नाहीत. मात्र, आता पोलीस बंदोबस्तामध्ये काम करण्यात येणार आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही.जी. कुलकर्णी यांनी सांगितले.

प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी पोलीस आयुक्त के. वेंकटेशन यांची भेट घेवून पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. त्यानुसार बंदोबस्त देण्यात आला आहे. येत्या दोन दिवसामध्ये प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती प्रकल्प प्रमुख प्रवीण गेडाम यांनी दिली.

380 कोटींचा प्रकल्प 600 कोटींवर
वारंवार प्रकल्पाला विरोध होत असल्यामुळे 380 कोटी रुपयांचा प्रकल्प 600 कोटी रुपयांवर जावून पोहोचला आहे. या प्रकल्पामुळे वडगावशेरी भागातील 14.50 लाख नागरिकांना पाणी मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पूर्व भागाला योग्य पाणीपुरवठा होत नसल्यामुळे अनेक अडचणी येत आहेत. वारंवार प्रकल्पग्रस्तांची आंदोलने होत असल्यामुळे जुलै 2018 काम पूर्ण होण्यासाठी उजाडणार आहेत. नगररस्ता, कळस, संगमवाडी, येरवडा, लोहगाव, धानोरी, कल्याणीनगर, वडगावशेरी, खराडी या भागाला 2041 पर्यंत पाणीपुरवठ्याचा विचार करून प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)