पोलीस प्रशासन मात्र मूग गिळून गप्प

शिक्रापूर -येथील पोलीस ठाण्याचा हद्दीमधील सर्वच गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध, बाटलीबंद तसेच गावठी दारू सर्रासपणे विक्री होत असून प्रशासन मात्र अद्यापही मूळ गिळून गप्प बसले असून दारूविक्रेत्यांना अभय देत असल्याचे दिसून येत आहे.

शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 33 गावे असून सर्व गावांमध्ये ढाबे, हॉटेल, तसेच गावठी दारू विक्रीचे मोठमोठे अड्डे दिवसाढवळ्या सुरु आहेत. कित्येक ठिकाणी पोलीस चौकी तसेच पोलीस ठाण्याशेजारीच काही अंतरावर दारुविक्री सुरु आहे. मात्र पोलीस तसेच इतर अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. अनेकदा नागरिकांनी पोलीस ठाण्यात फोन करून दारूविक्री होत असल्याची माहिती दिल्यास नागरिकांना “तुमचे नाव काय?’, “पोलीस ठाण्यात येऊन तक्रार करा’ असे प्रश्न केले जातात. त्यामुळे नागरिकदेखील आता पोलीस ठाण्यात फोन करून दारूविक्री होत असल्याची माहिती देण्याचा कंटाळा करू लागले आहेत. या दारूविक्रेत्यांना पोलिसांचीच साथ मिळत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. करंदी येथील गावठी दारुधंद्यांवर महिलांनी दोन वेळा छापा टाकून दारू जप्त केलेली आहे. तर शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या अनेक गावांमध्ये गावठी तसेच बाटलीबंद दारूविक्री होत असताना देखील प्रशासनास काहीही माहिती नसल्याने देखील आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. तर शिक्रापूर, पाबळ, कोरेगाव भीमा तसेच तळेगाव ढमढेरे या भागात स्वतंत्र पोलीस दूरक्षेत्र असून देखील या भागात सर्रास दारूविक्री होत असल्यामुळे नक्की दारूविक्री आहे की नाही असा प्रश्न आम्हाला पडत असल्याचे येथील नागरिक सांगत आहेत. शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 33 गावे असून या भागामध्ये कमीत कमी शंभरहून अधिक ठिकाणी दारूविक्री केली जात असताना देखील शिक्रापूर पोलिसांनी महिनाभरात फक्त शिक्रापूर येथे पाच, सणसवाडी येथे चार, पाबळ येथे एक, कान्हुर मेसाई येथे एक व करंदी येथे एक अशा फक्त पाच गावांमध्ये केवळ बारा ठिकाणी कारवाई केली असल्याचे आढळून आले आहे. मात्र पोलिसांनी कोणालाही पाठीशी न घालता दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.

एकाही अधिकाऱ्यावर कारवाई नाही
शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या प्रत्येक गावात ज्या बीट अंमलदारांच्या तसेच अधिकाऱ्यांच्या हद्दीत दारूविक्री आढळून येईन त्यांचेवर खात्याअंतर्गत कारवाई करणार असल्याचे लेखी पत्र पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांनी सर्व अधिकारी तसेच बीट अंमलदार यांना दिले होते. मात्र आठ महिने उलटून गेले अनेकदा काही गावांमध्ये दारू आढळून आली त्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करत दारू जप्त केली; मात्र अद्यापपर्यंत एकाही अधिकारी अथवा बीट अंमलदारांवर कसलीही कारवाई करण्यात आलेली नाही.

दारूबंदीमुळे अपघात कमी झाले – राजेंद्र मोरे
शासनाने दारूबंदी केल्यानंतर महामार्गावर होणाऱ्या अपघातांची संख्या खूपच कमी झाली असून अपघातामध्ये मयत होणाऱ्या व्यक्तीची संख्या देखील निम्म्याने कमी झाली असल्याचे आढळून आले आहे, असे दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे यांनी शिक्रापूर येथे एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना सांगितले. मात्र वरिष्ठ अधिकारी दारूबंदीच्या निर्णयाचे स्वागत करत असताना देखील कर्मचारी दारूबंदीसाठी विशेष प्रयत्न का करत नाहीत, असा प्रश्न निर्माण होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)