पोलीस पाटील यांनी निःपक्षपातीपणेकाम करावे : श्रीरंग तांबे

काळगाव – शासनाचा प्रतिनिधी म्हणून पोलीस पाटील काम करत आहेत. दुर्गम भागात पोलीस पाटील यांच्यावर काम करण्याची मोठी जबाबदारी आहे. गावामध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास पोलीस पाटलांनी तात्काळ प्रशासनाला कळवावे. जनतेचा दुवा म्हणून निपक्षपातीपणे काम करावे, असे प्रतिपादन प्रांतअधिकारी श्रीरंग तांबे यांनी केले.

पोलीस पाटील दिनानिमित्त नवारस्ता, ता. पाटण येथे आयोजित पोलीस पाटील ओळखपत्र वितरण, निवृत्त पोलिस पाटलांचा सत्कार समारंभ अशा संयुक्‍त कार्यक्रमात ते बोलत होते. उपविभागीय पोलीस अधिकारी अंगद जाधवर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर अतिग्रे, सहाय्यक फौजदार संतोष कोळी, पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष सुभाष कदम यांची उपस्थिती होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जाधवर म्हणाले, पोलीस पाटील हा पोलीस व जनतेमधील महत्वाचा दुवा असतो. त्यांनी गावामध्ये कायदा व सुव्यवस्थेचे पालन करुन सर्वसामान्य जनतेस न्याय देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता आपल्या कर्तव्याचे भान ठेवून पोलीस पाटील बांधवांनी सर्वसमावेशक काम करावे.

यावेळी सेवानिवृत्त पोलीस पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच नवनिर्वाचित पोलीस पाटील यांना ओळखपत्र वाटप करण्यात आले. यावेळी माजी पोलीस पाटील शामराव गालवे, पोलीस पाटील नितीन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सुभाष कदम यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन संभाजी चाळके यांनी तर आभार राहुल सत्रे यांनी मानले. मेळाव्यास तालुक्‍यातील पोलीस पाटील उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)