पोलीस दादाहो, जरा मोबाईल चोरट्यांकडेही बघा

वाईच्या आठवडी बाजारात चोरट्यांचा सुळसुळाट

मयूर सोनावणे

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सातारा – वाई शहरात दर सोमवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात गत वर्षभरापासून मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले आहे. वारंवार मोबाईल चोरीच्या घटना घडू लागल्यामुळे नागरिकांसह विक्रेतेही हैराण झाले आहेत. याप्रकरणी अनेकांनी पोलिसांत तक्रारीही दाखल झाली आहे. परंतु, अद्यापही वाई पोलिसांना या मोबाईल चोरट्यांचा छडा लावण्यात यश आलेले नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. विशेष म्हणजे मोबाईल चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने “पोलीस दादाहो जरा मोबाईल चोरट्यांकडेही बघा’, अशी आर्त हाक सर्वसामान्य वाईकर नागरिकांसह विक्रेत्यांकडून दिली जात आहे.

वाई शहरातील आठवडी बाजारात जावली, महाबळेश्‍वर, खंडाळ्यासह महाड तालुक्‍यातून व्यापारी वर्ग येत असतो. त्याचबरोबर खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांचीही मोठी गर्दी असते. कोणतेही गैरप्रकार न होता सुरु असलेल्या या आठवडी बाजाराला गत एक-दीड वर्षांपासून मोबाईल चोरट्यांचे ग्रहण लागले आहे. सुरुवातीच्या काळात या चोरट्यांकडे नागरिकांसह विक्रेत्यांनीही दुर्लक्ष केले. परंतु, आठवडी बाजारात मोबाईल चोरीच्या घटना घडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत गेल्याने अनेक नागरिकांनी याप्रकरणी वाई पोलिसात तक्रारीही दाखल केल्या. त्यानंतर मोबाईल चोरीला आळा बसेल अशी सर्वांनाच आशा होती. मात्र ही आशा फोल ठरली. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चोरटे पसार होत आहेत. चोरटे सापडत नसल्यामुळे पोलीसही आता या घटनांकडे दुर्लक्ष करु लागले आहेत की काय? असा प्रश्‍न नागरिकांसह विक्रेत्यांना पडु लागला आहे.

चोरट्यांकडून महागडे मोबाईल टार्गेट केले जात आहेत. या मोबाईलला सुरक्षेच्या दृष्टीने अनेक ऍप्लिकेशन्सस्‌ असतात. मात्र तरीही पोलिसांना चोरट्यांचा शोध लागत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. एरव्ही सर्वसामान्यांना नियमांचे धडे देणारे, तसेच किरकोळ घटनांमध्ये खाकीचा दाखवून एकाच घटनेत वेगवेगळे गुन्हे दाखल करणारे वाई पोलिस चोरट्यांपुढे मात्र हतबल झाल्याचेच प्रकर्षाने निदर्शनास येत आहे.

साहेब! कधीतरी मंडईतपण या
वाई शहरातील मंडईमध्ये चोरीच्या घटना वाढत आहेत. विशेषत: यामध्ये मोबाईल चोऱ्यांचे प्रकार अधिक आहे. मात्र, तक्रारी होऊनही पोलीस काही वाई शहरातील मंडईकडे फिरकायला तयार नाहीत. रस्त्यावर उभे राहून केवळ पावत्या फाडण्यातच पोलिसांकडून धन्यता मानली जात आहे. त्यामुळे नागरिकांसह विक्रेत्यामधून “साहेब! कधीतरी मंडईतपण या’ अशी हाक दिली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)