पोलीस ठाण्यात “रायझिंग्ग डे’ उत्साहात

पोलीस ठाण्यात “रायझिंग्ग डे’ उत्साहात

राजगुरूनगर- खेड पोलीस ठाण्यात “रायझिंग डे’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. तालुक्‍यातील नागरिक, विद्यार्थ्यांनी, पोलीस पाटील आणि महिला दक्षता समितीच्या महिलांनी पोलिसांच्या विविध शस्त्रांची पाहणी व हाताळणी करून माहिती घेतली.
पोलीस यंत्रणेची कार्यपद्धती, संवाद, कायदे, विद्यार्थ्यांत जनजागृती असे विविध कार्यक्रम या निमित्ताने खेड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घेण्यात आले. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला राज्य पोलीस दलातर्फे “रायझिंग डे’ हा उपक्रम राबविला जातो. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 2 जानेवारी या दिवशी राज्य पोलीस दलासध्वज प्रदान केला होता. त्याची आठवण म्हणून दरवर्षी ध्वजसप्ताह साजरा केला जातो. बुधवारी (दि.2) उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या हस्ते या सप्ताहाचे उद्‌घाटन होऊन सप्ताहाला सुरुवात करण्यात आली. गेले 6 दिवस पोलीस अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यानी विद्यार्थ्यांना पोलिसांकडे उपलब्ध असलेल्या विविध शस्त्रसाठ्याची अभ्यासपूर्ण माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले.
पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी विविध शस्त्रांची माहिती दिली. कार्यक्रमास विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते. महात्मा गांधी विद्यालय राजगुरूनगर, चांडोली येथील आय. टी. आय कॉलेज, हुतात्मा राजगुरू महाविद्यालय आदी शाळा कॉलेजच्या विद्यार्थांनी सहभाग घेतला. पोलीस ठाण्यात असणारी विविध शस्त्रे पाहून विद्यार्थी हरखून गेले. यावेळी विद्यार्थ्यांना बंदूक कशी असते, तिची रचना, ती कशी हाताळली जाते याबाबत माहिती देण्यात आली.या सप्ताहात पोलीस दलातर्फे विविध उपक्रम राबविले गेले. सायबर गुन्हे, ऑनलाईन फसवणूक, बॅंकिंग फ्रॉड व इतर मुद्‌द्‌यावर खेड तालुक्‍यातील पोलिस विविध गावातील पोलीस पाटलांना सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप येळे यांनी मार्गदर्शन केले.
दुचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्याबरोबर दुचाकींच्या अपघातांची आणि त्यात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. हेल्मेटचा वापर, चारचाकी वाहनांमध्ये सीटबेल्टचा वापर यासारख्या छोट्या उपाय योजनांचा अवलंब केला तरी अपघातातील मोठी जिवीतहानी टाळता येऊ शकेल. त्यासाठी सर्वांनी संवेदनशीलतेने आणि सजगपणे वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले. पोलिसांचा जनतेशी असणारा संपर्क वाढावा, तो अधिक वृद्धिगत व्हावा या उद्देशाने या उपक्रमांचे आयोजन करण्यात असल्याचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी सांगितले.

  • निर्भया पथकाच्या निदर्शनास
    निर्भया पथकातर्फे राबविलेल्या या मोहिमेत मुलींना होणाऱ्या छेडछाडीच्या त्रासाबद्दल त्यांनी धाडसाने पोलिसांशी बोलावे यासाठी मुली तक्रार करण्यासाठी पुढे आल्यामुळे टवाळखोरांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुलभ होईल. या मोहिमेत छेडछाड, टोमणे मारणे, अश्‍लील हावभाव करणे यासारखे प्रकार शालेय विद्यार्थ्यांकडून होत असल्याचे निर्भया पथकातील पोलिसांच्या निदर्शनास येत आहे. मुलांकडून मुलींना त्रास होत असल्याच्या तक्रार आल्यास निर्भया पथक यांच्यावर कारवाई करणार असल्याचे निर्भया पथक प्रमुख सारिका बनकर यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)