पोलीस उपायुक्‍त नम्रता पाटील यांची चौकशी होणार

पिंपरी – पिंपळे सौदागर परिसरात एका जमिनीबाबत व्यावसायिकांमध्ये न्यायालयात वाद सुरू आहे. याप्रकरणी न्यायालयाचा स्थगिती आदेश असताना देखील एका बांधकाम व्यावसायिकास जमीन मोजणीसाठी पोलीस बंदोबस्त दिल्याप्रकरणी पोलीस उपायुक्‍त नम्रता पाटील यांच्या चौकशी होणार आहे. पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी याबाबत आदेश दिले आहेत.

पिंपळे सौदागर परिसरात एका जमिनीबाबत वाधवानी आणि आसवानी या दोन बांधकाम व्यावसायिकांमध्ये न्यायालयात वाद सुरू आहे. न्यायालयाने येथील जागेबाबत स्थगिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या आदेशाचा भंग करून वाधवानी यांनी जमिनीची सरकारी मोजणी आणली. या मोजणीसाठी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी परस्पर बंदोबस्त दिला. या मोजणीला आसवानी यांनी आक्षेप घेतला. मात्र तरी देखील वाधवानी यांनी पोलिसांच्या मदतीने मोजणी सुरू ठेवली.

या मोजणीला आक्षेप घेणाऱ्या आसवानी यांच्या दोन कर्मचाऱ्यांना पोलिसांनी मारहाण देखील केल्याचा आरोप आहे. या प्रकाराबाबत बांधकाम व्यावसायिक श्रीचंद आसवानी यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. त्यानंतर सांगवी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक मोहन शिंदे, निरीक्षक प्रसाद गोकुळे, सहायक निरीक्षक योगेश आव्हाड यांच्यासह पाच अधिकाऱ्यांची आणि पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांची बदली केली. तसेच आसवानी यांनी उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली. न्यायालयाने पोलीस आयुक्तांना याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे.

कोणालाही पोलीस बंदोबस्त देण्याचा अधिकार हा फक्त पोलीस आयुक्तांनाच आहे. मात्र तरीही नम्रता पाटील यांनी जमिनीच्या मोजणीसाठी न्यायालयाच्या स्थगिती आदेशाविरोधात जाऊन परस्पर बंदोबस्त दिला. सांगवी पोलीस ठाण्यातील दोन निरीक्षक, दोन सहायक निरीक्षक आणि एक उपनिरीक्षक यांच्यासह पोलीस उपायुक्तांची बदली केली आहे. याशिवाय पोलीस उपायुक्तांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लवकरच प्रतिज्ञापत्र सादर केले जाईल.
– आर. के. पद्मनाभन, पोलीस आयुक्‍त, पिंपरी-चिंचवड.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)