पोलीस उपनिरीक्षक होऊन कोर्टीच्या तेजश्रीने केले आईचे अधुरे स्वप्न पूर्ण

अमोल पवार

उंब्रज, दि. 27 – आई हुशार असूनही परिस्थितीमुळे तिला शिकता आले नाही व सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. म्हणून तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दहावीला 73 टक्के गुण मिळवूनही सायन्स ऐवजी आर्टला प्रवेश घेऊन कोर्टी गावची कन्या तेजश्री थोरात हिने पोलीस उपनिरीक्षक होऊन आईचे अधुरे स्वप्न पूर्ण केले आहे.
कोर्टी, ता. कराड येथील तेजश्री हिची यशोगाथा सर्वसामान्य कुटुंबातील तसेच शिक्षणासाठी माध्यमे व शहरातील मोठे क्‍लासेस लावून यश प्राप्त करणाऱ्या मुलीसाठी प्रेरणादायक आहे. दहावीला 73 टक्के गुण आहेत. सायन्सला ऍडमिशन घे आर्टला पुढे कोणी विचारात नाही. अशा सल्ल्याने न थांबता, आर्टला ऍडमिशन घेतल्यानंतर सर्वानीच तेजश्रीला वेड्यात काढले. मात्र अगोदरच ध्येय निश्चित असल्याने तिने बी. एड. केले. व उच्चशिक्षित भाऊ व बहिणीप्रमाणे शिक्षण क्षेत्रातच यशस्वी काम करण्याचे ठरवले. मात्र सरकारी आदेशानुसार नवीन शिक्षक भरती रद्द झाल्याने तिच्यासमोर नकारात्मक अंधार दाटून आला. मात्र खचून गेलेल्या तेजश्रीला पदवीचे शिक्षण घेत असताना प्रा. सतिश जाधव, प्रा. खोत या शिक्षकांनी व आई-वडिलांनी मनोबल दिले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दे. तुला यश मिळेल, तुझ्यात ती जिद्द आहे. असा सकारात्मक दृष्टीकोन दाखवला. यावेळी तेजश्रीच्या आईने शिकण्याची प्रबळ इच्छा होती. मात्र आमच्या काळात मुलींना जास्त शिकवत नव्हते आणि नोकरीला तर अजिबातच संधी दिली जात नव्हती. त्यामुळे माझे शिक्षण अपुरे राहिले आहे. मला पण सरकारी नोकरी करायची होती पण शक्‍य झाले नाही. त्यामुळे ते स्वप्न तू पूर्ण कर. असे सांगितले. त्यानंतर जिद्दीने तेजश्रीने सन 2015 पासून परीक्षा द्यायला सुरुवात केली मात्र यश मिळत नव्हते. त्यानंतर किंगमेकर अकॅडमीचे विकास संकपाळ यांनी तिची पूर्वतयारी करून घेतली. अथक परिश्रम आणि अभ्यासाच्या जोरावर तेजश्रीने साडे तीन वर्षाच्या कालावधी नंतर पोलीस उपनिरीक्षक होण्याचे आईचे स्वप्न पूर्ण करून दाखवले.
वडील वाल्मिकी विद्यालयात क्‍लार्क असल्याने तेजश्री हिचे प्राथमिक व कॉलेजचे शिक्षण तळमावले येथेच झाले. त्यानंतर बी.एडचे शिक्षण जिजामाता विद्यालय सातारा येथे झाले. इंग्लिश विषयात पदवीधर असणारी तेजश्री ही कोर्टी गावातील दुसरी महिला पोलीस उपनिरीक्षक ठरली असून तिच्या या यशामुळे गावात आनंद व्यक्त केला जात आहे. वडील जयवंतराव थोरात हे सेवानिवृत्त असून ते सध्या कोठेश्वर पाणीपुरवठा सोसायटीचे चेअरमन आहेत. वडिलांनी कोणतीच गोष्ट कमी पडू दिली नाही व आई कमल हिने मुलगी असलीस तरी तू सरकारी अधिकारी होऊ शकतेस, हा आत्मविश्वास जागा करून पाठीशी ठामपणे उभे राहिल्याने हे यश मिळाले असल्याचे तेजश्री सांगते. तेजश्रीच्या या यशाबद्दल सर्वच स्तरामधून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)