पोलीस आयुक्‍तालय फुले शाळेतच

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरासाठी होणारे नवीन पोलीस आयुक्तालय चिंचवड प्रेमलोक पार्क येथील महापालिकेच्या महात्मा फुले शाळेच्या इमारतीमध्ये सुरु करण्यास विद्यार्थी व पालकांचा विरोध असताना ही इमारत पोलीस आयुक्तालयासाठी भाड्याने देण्यास स्थायी समितीने बुधवारी (दि.13) मान्यता दिली. तसेच हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी महासभेकडे पाठविला आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांच्या भुमिकेकडे लक्ष लागले आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला मंत्री मंडळाच्या 10 एप्रिल 2018 रोजी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विविध कक्षांसाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या एकूण चार हजार 840 पदांची आवश्‍यकता आहे. त्यापैकी पुणे पोलीस आयुक्तालय आणि पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण कडून दोन हजार 207 पदे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाकडे वर्ग करण्यात येणार आहेत. उर्वरित दोन हजार 633 पदे नव्याने भरती करण्यात येणार आहेत. नव्याने भरती करावयाची पदे तीन टप्प्यात भरली जाणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलीस आयुक्तालयाला मंजुरी मिळाल्यानंतर पोलिसांनी प्रशस्त जागा शोधण्यास सुरुवात केली. पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील, निगडीतील “फ’ क्षेत्रीय कार्यालयाची इमारत आणि चिंचवड प्रेमलोक पार्क येथील महापालिकेच्या महात्मा फुले शाळेच्या इमारतीची पाहणी करण्यात आली होती. यापैकी महात्मा फुले शाळेची इमारत पोलीस आयुक्तालयास योग्य असून ती इमारत भाड्याने देण्यात यावे, असे पत्र पोलिसांनी 5 मे 2018 रोजी पालिकेला दिले होते. त्यानुसार ही शाळेची इमारत पोलीस आयुक्तालयासाठी भाड्याने देण्यात येणार आहे. याबाबतच्या ठरावाला स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता देऊन अंतिम मान्यतेसाठी महासभेकडे शिफारस केली आहे.

दोन मजल्यांची ही शाळेची इमारत आहे. भूखंडाचे क्षेत्रफळ 4427.50 चौरस मीटर आहे. तळमजला 761.84 चौरस मीटर, पहिला मजला 731.29 चौरस मीटर आणि दुसरा मजला 712.00 चौरस मीटर आहे. शाळेसमोरील मोकळ्या मैदानाचे क्षेत्रफळ 3665.16 चौरस मीटर आहे. प्रत्येक मजल्यावर सात वर्गखोल्या असून एक सभागृह आहे. पालिका पोलिसांकडून इमारतीचे किती भाडे आकारणार आहे, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.

दरम्यान, शाळेतील विद्यार्थ्यांना दळवीनगर येथील रेल्वे लाईनला लागून असलेल्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे. येथे दिवसभर रेल्वेच्या आवाजाचा खडखडाट सुरु असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शाळेत लक्ष लागणार नाही. त्यामुळे पोलीस आयुक्तलयासाठी महात्मा फुले शाळेची इमारत देऊ नये, अशी मागणी विद्यार्थी, पालकांनी केली होती. त्यासाठी दोन दिवसांपुर्वी आंदोलनही केले होते. स्थायी समितीच्या आज होणाऱ्या बैठकीत यावर निर्णय होणार असल्याने या बैठकीकडे लक्ष लागले होते. मात्र, स्थायी समितीने फुले शाळेतच आयुक्तालय सुरु करण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थी व पालकांचा हिरमोड झाला आहे. आगामी महासभेमध्ये यावर अंतिम निर्णय होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)