पोलीस आयुक्‍तालयासाठी तीन कोटींचे फर्निचर

– महापालिकेने काढली निविदा ; कामासाठी चार महिन्यांची मुदत

पिंपरी – पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीच्या नुतनीकरणाबरोबरच फर्निचर खरेदीसाठीही महापालिकेने निविदा काढल्या असून त्यामध्ये 3 कोटींचे फर्निचर खरेदी केले जाणार आहे.

पालक मंत्री गिरीष बापट यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत 15 ऑगस्टच्या आधीच पोलीस आयुक्तालय सुरु होईल असे सांगितले आहे. त्यानुसार आयुक्तालयाच्या कामाला वेग आला असून प्रेमलोक पार्क येथील इमारतीतील फेरबदल, रंगरंगोटी याबरोबरच फर्निचर खरेदीच्याही 3 कोटी 86 लाख 50 हजार 150 रुपयांची निविदा महापालिकेने काढली आहे. ही निविदा ऑनलाईन पद्धतीने 13 ऑगस्टपर्यंत भरायची आहे.

यामध्ये कार्यालयातील टेबल, खुर्ची, सोफा, कपाट आदी वस्तूंचा समावेश असणार आहे. आधुनिक व सुसज्ज आयुक्तालय उभारण्यासाठी महापालिका प्रयत्न करत असून पुणे आयुक्तालयाच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाची उभारणी सुरु आहे. या निविदा मंजूर किंवा ना मंजूर करण्याचा अधिकार महापालिका आयुक्तांनी स्वतःकडे ठेवला आहे. फर्निचरच्या कामाची मुदत चार महिने असल्याने आयुक्‍तालय पुर्ण कार्यक्षमतेने सुरु होण्यास आणखी विलंब लागण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)