पोलीस आयुक्‍तालयाचे “बिऱ्हाड’ ऑटो क्‍लस्टरमध्ये

पिंपरी – पिंपरी पोलीस आयुक्तालयाचे तात्पुरते काम ऑटो क्‍लस्टर येथून सुरु करण्यात येणार असून त्याला महापालिकेनेही हिरवा कंदील दाखवला आहे. सध्या आयुक्‍तालयासाठी कर्मचारी भरती सुरु असून नव्याने आठ कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

ऑटो क्‍लस्टर सभागृहात येथे गुरुवारी नवीन सह आयुक्त मकरंद रानडे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस उप आयुक्त गणेश शिंदे, पक्षनेते एकनाथ पवार यांची बैठक पार पडली. या बैठकीत ऑटो क्‍लस्टर येथून पोलीस आयुक्तालयाची सूत्रे तात्पुरत्या स्वरूपात हलविण्यासाठी सहमती दर्शविण्यात आली. प्रेमलोक पार्क येथील इमारतीमध्ये रंगरंगोटीचे काम सुरु असून तेथे आयुक्तालयाचे काम सुरु करण्यासाठी किमान एक ते दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे.

-Ads-

दुसऱ्या बाजूला शुक्रवारी पुणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस फौजदार पदावरील 235 कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात आठ पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस शिपाई एच. सी. गायकवाड, विशाल माने, अमोल रावते, व्ही. आर. सानप, महिला पोलीस शिपाई आर. जी. खोमणे, के. डी. धोंडगे, पोलीस हवालदार आर. बी. मारेणे, ए. बी. जगताप यांची त्यांच्या मागणीवरून नियुक्ती करण्यात आली आहे.

आयुक्तालयासाठी एकूण 4 हजार 840 पदांची आवश्‍यकता आहे. त्यापैकी पुणे पोलीस आयुक्तालय आणि पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीणकडून 2 हजार 207 पदे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाकडे वर्ग करण्यात येणार आहेत. उर्वरित 2 हजार 633 पदे नव्याने भरती करण्यात येणार आहेत. त्याबाबत बदली, नियुक्ती प्रक्रिया जोरात सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर आठ कर्मचाऱ्यांची नियुक्ती पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयात करण्यात आली आहे.

चिखली पोलीस ठाण्याला गती
पोलीस आयुक्तालया बरोबरच चिखली येथे नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या चिखली पोलीस ठाण्यात शंकर आवताडे यांना बढती देत वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर या पोलीस ठाण्यासाठी 22 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये एक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पाच पोलीस हवालदार, नऊ पोलीस शिपाई, एक महिला पोलीस शिपाई, चार पोलीस नाईक आणि एक महिला पोलीस नाईक यांची त्यांच्या विनंतीवरून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे चिखली पोलीस ठाण्याच्या कामाला गती येणार आहे.

आयुक्‍तालयाचा मुहूर्त लांबला?
पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्‍तालय 1 मे रोजी सुरु होणार होते. मात्र आयुक्तालयासाठी जागा नसल्याने त्यावेळीही तारीख पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर चिंचवड मधील प्रेमलोक पार्क येथील महात्मा फुले शाळेची प्रशस्त इमारत पोलीस आयुक्तालयासाठी निश्‍चित करण्यात आली. 15 ऑगस्ट रोजी आयुक्तालय सुरु होणार असल्याचेही सांगण्यात आले. मात्र आयुक्तालयासाठी निश्‍चित केलेल्या इमारतीत आवश्‍यक सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. तसेच उदघाटन समारंभासाठी मुख्यमंत्र्यांची तारीख मिळत नसल्याने पुन्हा आयुक्तालयाचा 15 ऑगस्ट वरुन तो 17 ऑगस्ट होण्याची शक्‍यता आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)