पोलीस आयुक्‍तांनी सुनावले खडेबोल!

पिंपरी – शहरात अपहरण, घरफोड्या अशा गंभीर घटना घडत असताना देखील सोसायटी व दुकानदार परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसवत नाहीत, नागरिकांनीही सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून काळजी घेताना हलगर्जीपणा करायला नको, अशा शब्दात पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी खडेबोल सुनावले.

माही जैन या अपहृत मुलीच्या सुटकेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आयुक्तांनी सोसायटींच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्‍न उपस्थित केले. ते म्हणाले की, सोसायटी हे आता छोटेसे शहरच असते. याठिकाणी अनेक लोक एकत्र राहत असतात. त्यामुळे येथील नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करणे गरजेचे आहे. वाकड पोलिसांनी केलेल्या पाहणीमध्ये अनेक सुरक्षा रक्षक झोपलेले निदर्शनास आले. त्यानंतरही अनेक सोसायटींनी यावर कोणतीही उपाय योजना केली नाही. दुकानांमध्ये व सोसायटींमध्ये सीसीटिव्ही बसवलेले नसतात किंवा ते नादुरुस्त असतात. याचाच फायदा गुन्हेगार घेत आहेत.

सुरक्षा रक्षक केवळ गेट उघडण्यासाठी नसतात तर ते सुरक्षेसाठी असतात. याची जाणीव सोसायटीच्या नागरिकांना झाली पाहिजे. तसेच मुलांना शाळेतील बसमधून घरी सोडत असताना मुले कोपऱ्यावर किंवा रस्त्यावर न सोडता ती संबंधीत सोसायटीच्या गेटवरच सुरक्षा रक्षका समक्ष सोडण्यात यावीत, असा नियम करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील सर्व शाळांना आयुक्तालयामार्फत पत्र पाठवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आयुक्तांनी आरोपी हे परिसराची गेली आठ दिवसांपासून पहाणी करत होते याचा संशय नागरिकांना आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही. नागरिकांनी संशयास्पद कोणाची वागणूक किंवा हालचाल दिसताच त्वरीत पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन नागरिकांना केले.

“त्या’ घरमालकावर कारवाई होणार
माहीच्या अपहरण प्रकरणातील गुन्हेगारांनी ऑनलाईन भाडेतत्त्वावर फ्लॅट घेतला होता. ही बाब गंभीर आहे. कोणतीही खातरजमा न करता, कोणताही भाडेकरार न करता भाडेकरु ठेवणे हा देखील मोठा गुन्हा आहे. यानुसार संबंधित घर मालकांवर देखील कारवाई करणार असल्याचे आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांनी यावेळी सांगितले. नागरिकांनी काळजी घेतली तर अनेक गुन्ह्यांना आळा बसेल. यासाठी नागरिकांनी सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन देखील पोलीस आयुक्तांनाही यावेळी नागरिकांना केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)