पोलीस आयुक्‍तांच्या आदेशानंतर देहुरोडमधील अवैध धंदेवाले भूमिगत

  • पोलिसांच्या कारवाईने नागरिकांना दिलासा; कायमस्वरुपी अंमलबजावणीची गरज

देहुरोड – देहुरोड परिसरातील सर्व अवैध धंदे बंद करण्याचे आदेश पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्‍त आर. के. पद्‌मनाभन यांनी दिल्यानंतर देहुरोडमध्ये अवैध धंदे करणारे सोमवारी (दि. 11) भूमिगत झाले आहेत. एवढेच नव्हे, तर या आदेशामुळे पोलीस दलातील अनेक अधिकारीही नाराज झाले असले तरी पोलिसांच्या कारवाईनंतर नागरिकांना मात्र दिलासा मिळाला आहे. आज बंद झालेले देहुरोडमधील अवैध धंदे कायमस्वरुपी बंद ठेवण्यासाठी पोलिसांनी उपाय योजिले पाहिजेत, अशी अपेक्षाही नागरिकांनी आज व्यक्त केली.

देहुरोड मुख्य बाजारपेठेतील भाजी मंडई जवळ असणाऱ्या गणेश मंदिरा शेजारी सुरू असलेल्या बेकायदा मटका, जुगार व्यवसायाने मंडई परिसरात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, युवती तसेच महिलाची अश्‍लिल शेरेबाजी करीत इशारा करून छेडछाड करण्याचे प्रकार घडत असल्याने असे अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष अली शेख यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍त आर. के. पद्‌मनाभन यांच्याकडे केली आहे. अली शेख यांनी दिलेल्या निवेदनानंतर पोलीस दल हालले आणि देहुरोडमधील अवैध धंदेवाल्यांची पळता भूई थोडी झाली. पोलीस आयुक्‍तांच्या कारवाईचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

शहरात अनेक ठिकाणी मटका, पत्त्यांच्या नावाखाली जुगाराचे अड्‌डे चालू आहेत. सध्या शहरातील अवैध धंदे आणि त्यांचे चालक भूमिगत झाले आहेत. काही ठिकाणी छुप्या पद्धतीने अवैध धंदे सुरू आहेत. लॉटरीच्या नावाखाली मटका खेळला जात आहे तर सोरटच्या नावाखाली जुगार खेळला जात आहे. शहराच्या मध्यवस्तीतील अनेक लॉटरी व्यावसायिक अशा पद्धतीचा व्यवसाय करीत आहेत. पोलीस आयुक्‍तांच्या आदेशानंतर अवैध धंदे थंडावले असले तरी भविष्यात ते पुन्हा सुरू होऊ नये, यासाठी ठोस उपाययोजनेची गरज असल्याचे मत सुज्ञ देहुरोड वासियांकडून मांडले जात आहे.

आता छुप्या धंद्यांवर पोलिसांचा “वॉच’
देहुरोडमधील अवैध धंदे करणाऱ्यांची आता पोलीस खैर करणार नाहीत, असे पोलीस आयुक्‍त पद्‌मनाभन स्पष्ट केले आहे. धंदे बंद करण्याची कारवाई सुरू आल्यामुळे चोरी छुपे धंदे सुरू राहणार आहेत; मात्र असे धंदे सुरू राहणे संबंधित पोलीस निरीक्षकांना परवडणारे नाहीत. गैरप्रकार उघड झाल्यास अशा पोलीस अधिकाऱ्यांची अथवा कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे पोलिसांचा देहुरोडमधील खुलेआम आणि चोरीछुपे सुरू असलेल्या धंद्यांवर “वॉच’ ठेवण्यात येणार आहे.

एक फोन करा धंदे तात्काळ बंद पाडू
देहुरोड पोलीस ठाणे हद्दीत लपून छपून, मोबाईलवर अथवा कुठेही अवैध धंदे सुरू असल्यास त्वरित कारवाई करण्यात येणार आहे. मटका, जुगार, अवैध धंदे सुरू असल्यास नागरिकांनी देहुरोड पोलीस ठाण्याशी 020 27671288 अथवा 100 संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
– प्रकाश धस, पोलीस निरीक्षक, देहुरोड पोलीस ठाणे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)