पोलीस आयुक्‍तच नियम मोडतात तेव्हा…!

– “नो पार्किंग’मध्ये उभी केली कार
– सोशल मीडियावर छायाचित्र “व्हायरल’

पिंपरी – शहरात वाहतुकीच्या नियमांचा आग्रह धरणारे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची कार भर रस्त्यात उभी करण्यात आली. त्यावेळी काही नागरिकांनी हा प्रकार कॅमेरामध्ये कैद करुन सोशल मीडियावर “व्हायरल’ केला. नागरिकांच्या या सजगतेमुळे अखेर आयुक्तांनी माझ्याही गाडीवर नक्की कारवाई होणार, अशी ग्वाही दिली.

-Ads-

आकुर्डी रेल्वे स्थानकासमोरील रस्त्यावर पोलीस आयुक्तांच्या अनुपस्थितीत “नो पार्किंग’मध्ये त्यांची कार लावण्यात आली. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आयुक्तांच्या कारवर देखील कारवाई होणार आहे. या ठिकाणी कार किंवा अन्य वाहने लावल्यास वाहतूक विभागाकडून तात्काळ कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाईची मोहीम शहरात सर्वत्र सुरु आहे.

बुधवारी (दि.28) सकाळी सव्वा नऊच्या सुमारास पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची कार संबंधित चालकांनी आयुक्तांच्या अनुपस्थितीत या रस्त्यावरील “नो पार्किंग’मध्ये लावली. याचे स्थानिक नागरिकांनी फोटो काढले. त्यानंतर शिस्तप्रिय पोलीस आयुक्तांच्या कारला नियमांचे बंधन नाही का? अशी चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली. याबाबत पोलीस आयुक्तांना विचारले असता, त्यांनी संबंधितांवर कारवाई होणार असल्याचे सांगितले.

नागरिक चुकीच्या गोष्टी दाखविण्यासाठी पुढे येत आहेत, ही स्वागतार्ह बाब आहे. अधिकारी असो किंवा अन्य कोणीही असो नियम सर्वांसाठी सारखेच आहेत. माझ्या अनुपस्थितीत कार “नो पार्किंग’मध्ये लावण्यात आली आहे. ही बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. मी स्वतः कारवाई करणार आहे.
– आर. के. पद्मनाभन, पोलीस आयुक्‍त, पिंपरी-चिंचवड.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)