पोलीस आयुक्तांनी दुचाकीवरून हेल्मेट घालून फिरावे

सक्‍तीविरोधात “पुणेरी’ सल्ला : रस्त्यावर उतरण्याचाही इशारा

पुणे – “पोलीस आयुक्‍तांनी एकदा मोटारीऐवजी दुचाकीवरून हेल्मेट घालून शहरात फिरावे, मगच हेल्मेटसक्तीचा निर्णय घ्यावा, असा तिरकस सल्ला देत हेल्मेट सक्तीविरोधी कृती समितीने शहरात हेल्मेटसक्ती राबविण्यास विरोध केला आहे. दरम्यान, 1 जानेवारी पासून हेल्मेटसक्ती केल्यास त्याविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशाराही कृती समितीने दिला आहे.

पोलीस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम्‌ यांनी 1 जानेवारी 2019 पासून पुण्यात हेल्मेट सक्ती लागू करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर हेल्मेट सक्तीविरोधी कृती समितीची मंगळवारी आनंदऋषिजी ब्लड बॅंकेत मंगळवारी बैठक झाली. यात हेल्मेट सक्तीविरोधात पुणेकरांच्या भावना निवेदनाद्वारे आयुक्तांना देण्यात येतील, असा निर्णय घेण्यात आला. त्यानंतरही सक्ती मागे न घेतल्यास निदर्शने, रास्ता रोको आणि सविनय कायदेभंगाचा पवित्राही समितीच्या सदस्यांनी घेतला आहे. या समितीचे नेतृत्व ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक यांच्याकडे देण्यात आले आहे. यावेळी अंकुश काकडे, विवेक वेलणकर, शांतीलाल सुरतवाला, मोहनसिंग राजपाल, संदीप खर्डेकर, श्‍याम देशपांडे, रुपाली पाटील, संजय बालगुडे, बाळासाहेब रूणवाल, प्रदीप देशमुख, मनाली भिलारे, मंदार जोशी, धनंजय जाधव आदी उपस्थित होते.

“हेल्मेटसक्‍तीला पुणेकरांचा पहिल्यापासून विरोध आहे. आता चौथी वेळ आहे. चारचाकी गाडीतून फिरणाऱ्यांचा यामागे हात असल्याचे बोलले जात आहे. सर्व पक्ष व सर्व संघटना सक्तीविरोधात एकत्र आहेत. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचा आदेश असल्याचे सांगत सक्ती केली जात असेल, तर ते चुकीचे आहे. उच्च न्यायालयाचा स्पष्ट आदेश आहे, पुण्यातील स्पीड ब्रेकर अशास्त्रीय पद्धतीचे आहेत. आधी ते काढून टाका,’ असे सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर म्हणाले.

“मागील अनेक वर्षांपासून पुणेकर हेल्मेटसक्तीला विरोध करतात. सक्ती करु नका, ज्याला हेल्मेट वापरायचे त्याला वापरू द्या. यामध्ये अनेक प्रश्‍न आहेत, स्पीड ब्रेकर व इतरही अनेक कारणांमुळे मृत्यू होतात. हेल्मेट वापरण्याला नाही तर सक्तीला विरोध आहे,’ असे माजी नगरसेवक धनंजय जाधव म्हणाले.

“दर दोन ते तीन वर्षांनी नवीन पोलीस आयुक्त आले की, हेल्मेट सक्तीचा निर्णय घेतला जातो. आजवर पुणेकरांनी हेल्मेटसक्ती नाकारली आहे. पोलीस आयुक्तांना विनंती आहे, की या निर्णयाचा पुन्हा विचार करा,’ असे माजी नगरसेविका रुपाली पाटील म्हणाल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)