पोलीस आयुक्तांना “भरोसा’ नाय काय?

संग्रहित छायाचित्र

– संजय कडू

‘भरोसा’ शाखेसाठी आर्थिक गुन्हे शखेचा बाजार उठवणार

-Ads-

पुणे – महिलांच्या तक्रारींची संख्या वाढत असून गुन्हे शाखेच्या महिला सहाय्य कक्षात तक्रारीसाठी येणाऱ्या महिलांना विविध गोष्टींसाठी इतरत्रही जावे लागते. त्यामुळे नर्सिंग होमसारख्या सर्व सुविधा एका छताखाली मिळाव्यात, यासाठी “भरोसा’ ही नवीन शाखा अस्तित्वात आणली जाणार आहे. मात्र, यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचा बाजार उठविण्यात येणार आहे. सध्या आर्थिक गुन्हे शाखेचे कार्यालय संगम पुलाजवळ आहे. येथून ते थेट पोलीस आयुक्त कार्यालयाच्या टेरेसवर “शिफ्ट’ करण्यात येणार आहे. महिला सहाय्य कक्षाऐवजी “भरोसा’ शाखा सुरू केल्यावर यामध्ये प्रशिक्षित पोलीस, समुपदेशक, वकील, वैद्यकीय अधिकारी, महिला व बाल विभागाचे सुरक्षा अधिकारी एकाच ठिकाणी उपलब्ध असतील.

सध्या पोलीस आयुक्तालयात कॅन्टिनजवळ पत्र्याच्या शेडमध्ये महिला सहाय्य कक्ष आहे. येथील जागा अपुरी पडणार असल्याने “भरोसा’ शाखेसाठी जागेचा शोध सुरू करण्यात आला होती. यातच पोलीस आयुक्तांच्या जवळील एका अधिकाऱ्याची नजर संगम पुलाजवळील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयावर पडली. संबंधित अधिकाऱ्यांनी नुकतीच या जागेची पाहणीही केली आहे. ही जागा पोलीस आयुक्तांनाही पसंत पडली आहे. यामुळे या जागेवर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे.

तंबू ठोका नाहीतर, काहीपण करा
ही जागा ठरल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्याला पोलीस आयुक्तांनी बोलावले होते. त्यांना विभाग शिफ्ट करण्यासाठी सांगितले गेले. मात्र, सध्या आर्थिक गुन्हे शाखेत डीएसके, टेम्पल रोझ, समृद्ध जीवन आदी बड्या गुन्ह्यांचा तपास आहेत. या प्रत्येक गुन्ह्यांच्या तपासाच्या शेकडो फाईलींचे गठ्ठे आर्थिक गुन्हे शाखेत पडून आहेत. यामुळे संबंधित वरिष्ठाने कार्यालयाचे स्थलांतरण कठीण असल्याचे सांगितले. मात्र, यावर त्याला “तुम्ही मैदानात तंबु ठोका नाहीतर काहीही करा, पण जागा खाली करा’ असे सांगितले गेल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

भरोसा शाखेचा “नागपूर पॅटर्न’
नागपूर येथे भरोसा शाखा सुरू करण्यात आली होती. तेथे मोठ्या प्रमाणात महिलांचे प्रश्‍न सोडवण्यात यश आले. नवविवाहित ते ज्येष्ठ महिलांना या शाखेने चांगलाच “भरोसा’ दिला होता. यामुळे पुण्यातही महिला सहाय्य कक्षाऐवजी “भरोसा’ शाखा सुरू करण्यात येणार आहे. येथे एकाच छताखाली महिलांच्या सर्व समस्यांवर तोडगा, समुपदेशन आणि कारवाईची कार्यवाही करण्यात येणार आहे.

ज्येष्ठ तक्रारदारांचे हाल होणार
आर्थिक गुन्हे शाखेमध्ये दाखल होणारी प्रकरणे तसेच गुन्ह्यांची व्याप्ती मोठी आहे. यामुळे एखादा मोठा गुन्हा आल्यास त्यासंबंधी तक्रार अर्ज व इतर कागदपत्रांनी दोन-चार कपाटे भरलेली असतात. सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडे बड्या प्रकरणांचा तपास आहे. संगम पुलावजळील कार्यालयात 8 पोलीस निरीक्षक बसतात. या सर्वांना तसेच येथील कागदपत्रांना टेरेसवरील सायबर क्राईम सेलच्या कार्यालयात स्थलांतरित केल्यास ती जागा अपुरी पडणार आहे. शिवाय ही सर्व महत्त्वाची कागदपत्रे तेथे नेणे अडचणीचे ठरणार आहे. यातच आर्थिक गुन्ह्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याने ज्येष्ठांचे प्रमाण मोठे आहे. त्यांना तीन मजले चढून तक्रार देण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)