पोलीस अधीक्षकांना चोरट्यांची श्रीगोंद्यात अनोखी सलामी!

ढोकराई(ता.श्रीगोंदे)- येथील चोरी झालेल्या ठिकाणी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी येऊन पाहणी केली.

शहारासह काष्टी, ढोकराई, कारखाना, कोळगाव परिसरात चोरीच्या घटना : सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या घरीही चोरी

श्रीगोंदे – पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा शनिवारी एका कार्यक्रमासाठी तालुक्‍याच्या दौऱ्यावर होते. मात्र शनिवारी रात्री शहरासह काष्टी, ढोकराई, श्रीगोंदे कारखाना, कोळगाव शिवारात चोऱ्या करीत चोरट्यांनी पोलीस अधीक्षकांना अनोखी सलामी दिली. शहरात तर एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तालुक्‍यातील काष्टी येथील तुळसाई नगरमध्ये चंद्रशेखर काळे यांचे बांधकाम व्यवसायाशी निगडित दुकान आहे. काळे यांच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. वीस हजार किमतीचा लॅपटॉप आणि 68 हजार रुपये असा एकूण 88 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ही घटना शुक्रवारी (दि.3) सकाळी उघडकीस आली. चंद्रशेखर काळे यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदविला आहे.

श्रीगोंदे शहरातील हनुमाननगरमध्ये भाऊसाहेब साबळे या सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचे घर आहे. शनिवारी मध्यरात्री त्यांचे घर बंद असल्याने घर फोडले, मात्र ऐवज चोरीला गेला नाही. साबळे यांच्या शेजारील गाडीलकर यांच्या घराची खिडकी तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. खिडकीतून घरात प्रवेश करत आतून कडी लावत निवांतपणे जवळपास दीड लाख रुपयांचा सोन्याचा ऐवज चोरून नेला. भागवत नागनाथ बुऱ्हाडे (रा. दौंड, ता. दौंड) यांचे काष्टी येथे भगवती ज्वेलर्स नावाने सराफाचे दुकान आहे. शनिवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास बुऱ्हाडे यांच्या दुकानाचे सायरन वरून बुऱ्हाडे यांना संदेश गेला. याचवेळी गाळामालक प्रकाश पाचपुते यांनी चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटल्याचे फोनवर सांगितले. मात्र दुकानाचा सायरन वाजल्याने चोरटे पळून गेले. याबाबत बुऱ्हाडे यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदे पोलिसांनी अज्ञात व्यक्‍तींविरुद्ध शटर उचकटून चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.

तालुक्‍यातील ढोकराई फाटा येथे सुनील यादव या परप्रांतीय व्यक्तीचे दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे तो आपल्या सहकऱ्यांसह शेजारील गाळ्यात झोपला होता. शनिवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास काही चोरट्यांनी येऊन दमदाटी करीत त्याच्याकडे असलेली चाळीस हजार रुपयांची रक्‍कम लंपास केली. त्याने ही रक्‍कम दूध उत्पादकांचे पगार करण्यासाठी आणल्याची माहिती समजली. त्याचबरोबर शनिवारी रात्री श्रीगोंदे कारखाना येथील बारामतीकर ज्वेलर्स या सराफ दुकानाचे शटर तोडून चोरांनी आतमध्ये प्रवेश केला. या दुकानातून चोरांनी सोन्याच्या काही दागिन्यांसह इंटरनेटचे मोडेम, दूरध्वनीची आदींची चोरी केली. या चोरांनी या दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखील तोडफोड केली. त्याचबरोबर कोळगाव फाटा येथून प्रसाद गजानन शिंदे यांच्या राहत्या घरासमोरून शनिवारी रात्री महिंद्रा स्कॉर्पिओ (एम. एच. 02 ए व्ही 5139) ही चारचाकी चोरीला गेली. चारचाकी प्रसाद शिंदे यांची चुलती भारती गणेश शिंदे यांच्या नावावर आहे. त्या मुंबईत वास्तव्यास आहेत. याबत प्रसाद शिंदे यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदविला आहे. बेलवंडी हद्दीतून काही दुचाकीदेखील चोरीला गेल्याचे समजते.

टायर फुटला अन्‌ चोर निसटले…

शनिवारी रात्री पोलीस कर्मचारी गस्त घालत असताना पहाटे चार वाजेच्या सुमारास सहायक फौजदार अनिल भारती, संभाजी वाबळे यांना विठाई पतसंस्थेसमोर एक चारचाकी संशयितरित्या उभी असल्याचे पाहिले. पोलिसांनी या गाडीजवळ जाण्याचा प्रयत्न केला असता ती गाडी नगरच्या दिशेने भरधाव वेगाने निघाली. पोलिसांनी त्या गाडीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र काही अंतरावर जाताच पोलिसांच्या वाहनाचा टायर फुटल्याने चोर पळून जाण्यात यशस्वी झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)