पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा ‘खेळखंडोबा’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे प्रकरण पोलीस आयुक्त आर. के. पद्‌नाभन यांना भोवणार हे निश्‍चित झाले आहे. अस्थापनेवरील अधिकारी बदलाचे अधिकार केवळ पोलीस महासंचालक कार्यालयाला असतानाही आयुक्तांनी स्वत:च्या अधिकारात केलेल्या बदल्या नियमबाह्य ठरण्याची शक्‍यता आहे. त्यातच पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात या अधिकाऱ्यांना रुजू करून घेण्यावरून सुरू असलेली खलबते या प्रकाराला दुजोरा देणारी ठरली आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या निर्मितीनंतर पिंपरी-चिंचवड आणि पुणे पोलीस आयुक्तालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमधील गोंधळ अद्याप कायम आहे. 28 मे 2018 च्या शासन आदेशानुसार पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या अस्थापनेवर अधिकारी वर्ग करण्यात आले होते. जे अधिकारी वर्ग केले त्याव्यतिरिक्त जे अधिकारी कार्यरत होते, त्यांनी पुणे आयुक्तालयात हजर होणे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही. त्यामुळे पुणे आयुक्तांनी पिंपरी-चिंचवडकडे अतिरिक्त ठरलेल्या अधिकाऱ्यांना पुणे आयुक्तालयाकडे पाठविण्यासाठी पोलीस महासंचालकांशी पत्रव्यवहार केला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संबंधित अतिरिक्त ठरलेल्या 32 अधिकाऱ्यांची एक यादीही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. पुणे आयुक्तांचा पत्रव्यवहार आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या यादीमुळे पिंपरी-चिंचवडमधील अतिरिक्त ठरलेले अधिकारी पुण्याकडे वर्ग केले जाणार हे निश्‍चित झाले होते. पोलीस आयुक्त पद्‌मनाभन यांनी 14 फेब्रुवारी 2019 रोजी एक आदेश काढत 8 पोलीस अधिकाऱ्यांच्या पुणे आयुक्त कार्यालयात बदल्या केल्या. आश्‍चर्याची बाब म्हणजे जे अधिकारी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या अस्थापनेवर आहेत, त्या 5 अधिकाऱ्यांची अनधिकृतपणे नावे घुसडत त्यांची बदली करण्यात आल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली. अस्थापनेवरील अधिकाऱ्यांच्या आयुक्तालय बदलीचे अधिकार केवळ पोलीस महासंचालकांनाच आहेत. हे अधिकार पोलीस आयुक्तांना नसताही पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या आयुक्तांनी केल्यामुळे हे अधिकारी या आदेशाविरोधात मॅटमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे पिंपरीच्या आयुक्तांनी अस्थापनेवरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करून नियमभंग केला हे समोर आल्यामुळे पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांना रुजू करून घेण्याबाबत मोठी खलबते चालली आहेत. महासंचालकांच्या आदेशाशिवाय अशा पद्धतीने अधिकारी रुजू करून घेतले तर मॅटमध्ये पुणे पोलीस आयुक्तही पार्टी होवू शकतात, अशी चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे. बदली झालेल्यांमधील एक अधिकारी शनिवारी (दि. 16) पुणे कार्यालयात रुजू होण्यासाठी गेले होते. मात्र त्यांना रुजू करून घेण्याबाबत कोणताही आदेश न झाल्याचे समजते. रुजू होण्याबाबत सोमवारी निर्णय घेतला जाईल, असे सांगत संबंधित अधिकाऱ्याला परत पाठविल्याची चर्चा आहे.

पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांचीही बदली आयुक्त पद्‌नाभन यांनी केली होती. या बदलीच्या विरोधात पाटील या मॅटमध्ये गेल्या होत्या. मॅटचा नुकताच निकाल असून आयुक्तांनी केलेली बदली ही बेकायदा असल्याचे मॅटने आदेशात म्हटले आहे. हा निर्णय ताजा असतानाच पुन्हा पोलीस अधिकाऱ्यांच्या बेकायदा बदल्या करण्यात आल्यामुळे पाटील प्रकरणाची पुनरावृत्ती होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. जे 32 अधिकारी िंपपरी-चिंचवड आयुक्तालयात अनधिकृत अथवा अतिरिक्त ठरविण्यात आले आहेत, त्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करणेही कायदेशीर दृष्ट्या आता अडचणीचे ठरणार आहे. एखादा अधिकारी 3 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी एखाद्या ठिकाणी कामावर असल्यास त्याला त्याच ठिकाणी निश्‍चित मानले जाते. जे अधिकारी अतिरिक्त ठरविण्यात आले आहेत, ते अधिकारीही 3 महिन्यांपेक्षा अधिका काळ आपल्या पोस्टींगवर असल्याने आता त्यांच्या बदल्यांचा निर्णयही पोलीस महासंचालक कार्यालयाकडूनच घेणे क्रमप्राप्त असल्याचे सांगण्यात येत आहे.

‘ते’ अधिकारी मॅटमध्ये जाणार
अनधिकृतरित्या अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्या या आमच्यावरील अन्याय असल्याची भावना संबंधित अधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. या निर्णयाविरोधात मॅटमध्ये जाण्याचा निर्णय काही अधिकाऱ्यांनी घेतला आहे. आम्ही पिंपरी-चिंचवडच्या अस्थापनेवर असतानाही अचानकपणे आयुक्तांनी घेतलेला हा निर्णय धक्कादायक असल्याचेही काही अधिकाऱ्यांनी दैनिक ‘प्रभात’शी बोलताना सांगितले.

नसलेल्या अधिकारांचा वापर
प्रशासकीय कामकाजाचा अनुभव सर्वच अधिकाऱ्यांना आहे. मात्र काहीजण चुकीची माहिती पुरवून असे प्रकार घडवित आहेत. अधिकारच नसताना पिंपरीच्या आयुक्तांकडून दोनवेळा बदल्यांच्या बाबत झालेला प्रकार निश्‍चितच चुकीचा आहे. अशा पद्धतीने अधिकाऱ्यांच्या बदल्या आयुक्तांना करता येत नाहीत. यापुढे तरी असे प्रकार घडू नयेत, याची काळजी घेतली पाहिजे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.

उपनिरीक्षक गभालेंवर अन्याय
पोलीस उपनिरीक्षक नंदराज गभाले हे गडचिरोली येथे नक्षलग्रस्त भागात सेवा बजावत होते. या परिसरामध्ये सेवा बजाविणाऱ्या अधिकाऱ्याला आवडीचे ठिकाण देण्याची शासनाची पद्धत आहे. गभाले हे आपल्या आवडीच्या ठिकाणी (हिंजवडी पोलीस ठाणे) शासन निर्णयानुसार आले होते. अशा पद्धतीने एखादा अधिकारी बदली होवून आला असल्यास संबंधिताची बदली ही ठराविक वेळेपूर्वी करता येत नाही. हा पोलीस खात्यातील नियम आहे. या नियमाला देखील हरताळ फासत गभालेंची बदली करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)