पोलिस भरतीच्या नावाखाली अडीच लाखाची फसवणूक

सांगलीच्या युवकाची तक्रार ;करंजे येथील आरोपीला अटक
सातारा, दि. 29 (प्रतिनिधी)
पुणे येथील शिवाजीनगर येथे पोलिस भरती करतो असे सांगत सांगली जिल्ह्यातील युवकाची अडीच लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहरातील करंजे येथील एकावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून रात्री उशीरा संशयीत आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
जितेंद्र सर्जेराव पाटील रा. नाटोली ता. शिराळा जि. सांगली याला थेरगाव जि. कोल्हापूर येथील त्याच्या दाजीकडे काम करणाऱ्या रेडेकर नावाच्या चालकाने आपल्या ओळखीचा संदीप सोपान गायकवाड रा. करंजे पेठ, सातारा हा पोलिस दलातील बडा अधिकारी असून तो तुला पोलिस दलात भरती करेल असे जानेवारी महिन्यात सांगीतले होते. त्यानुसार तक्रारदार जितेंद्र व त्याचे नातेवाईक हे महामार्गावर असलेल्या साताऱ्यातील एका हॉटेलवर भेटले होते. त्यावेळी संशयीत आरोपी गायकवाड व तक्रारदार यांच्यात भरतीबाबत चर्चा झाल्यानंतर गायकवाड याने तुम्हाला माझ्यावर विश्‍वास नसेल तर माझा एक चेक घ्या असे म्हणत आयडीबीआय बॅंकेचा तीन लाखाचा चेक देत विश्‍वास मिळवला. त्यानंतर पाटील यांनी ऑनलाईन पध्दतीने वेळोवेळी गायकवाड याच्या बॅंक खात्यावर आडीच लाख रूपये भरले होते. त्यानंतर मार्च 2018 मध्ये पुणे येथील शिवाजीनगर येथे भरती सुरू असल्याने पाटील हा भरतीसाठी गेला असता गायकवाड याने त्यांना तू भरतीसाठी आत जाऊ नको तुझे काम मी केले आहे बिनधास्त राहा असे म्हणत परत पाठवले होते. या भरतीचा निकाल लागल्या नंतर पाटील यांनी माझ्या कामाचे काय झाले असे विचारले असता माझ्या वरिष्ठ साहेबांनी तू वेळेत भरतीच्या ठिकाणी गेला नाहीस त्यामुळे तुझे काम केले नाही असे सांगीतले. गायकवाड याने दिलेल्या उडवाउडवीच्या उत्तराने शंका निर्माण झाल्याने पाटील यांनी पैसे परत मागण्यास सुरूवात केली तेव्हा गायकवाड याने ते पैसे मी रेल्वेमध्ये काम करण्यासाठी दिले आहेत असे सांगीतले व काही दिवसानंतर पाटील याला आकाश भटनागर नावाच्या जीमेल अकाऊंटवरून रेल्वेमध्ये निवड झाल्याचा मेल आला व भुसावळ येथे प्रशिक्षण असल्याचे कळवले होते. दरम्यानच्या काळात गायकवाड याने दिलेल्या चेकची मुदत संपल्याने पाटील यांनी नवा चेक मागण्यास सुरुवात केल्याने त्याने पाटील यांना पुन्हा आयडीबीआय बॅंकेचा आडीच लाखाचा चेक दिला व लवकरच रेल्वेत काम होईल असे सांगितले होते. गायकवाड याने दिलेली वेळ व ईमेलवरून आलेल्या संदेशातील प्रशिक्षणाची तारीख निघुन गेल्याने पाटील यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी गायकवाड याला पैशाची मागणी केली असता त्याने दमदाटी करण्यास सुरूवात केल्याने पाटील यांनी अखेर शाहूपुरी पोलिस ठाण्यात संदीप गायकवाड याच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्‍या तात्काळ आवळल्या.
————————————————————————
शाहूपुरी पोलिसांना याचा तपास करावा लागेल
संदीप याने केलेली फसवणूक ही त्याने एकट्याने केलेली आहे की , त्यात अजुन काही जणांचा समावेश आहे का ? यासह त्याला पोलिस दलाची वर्दी असलेली खाकी कुणी दिली? ती शिवली कुठे? त्याने आणखी कोणाला फसवले आहे का? या प्रश्‍नांची उत्तरे शाहूपुरी पोलिसांना शोधावी लागणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)